Daily Mahasatta

Daily Mahasatta

म्हणून...मी स्वतः कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली : अॅड. पाटील

विटा (प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढताना दिसत आहेत. त्यामुळे स्वतःला या आजारापासून दूर ठेवण्यासाठी लस घेणे हे जरुरीचे आहे. सर्वच पात्र नागरिकांनी उत्सपूर्तपणे कोविशिल्ड हि शासन प्रमाणित तसेच सर्व परीक्षेत योग्य ठरलेली लस घेण्यासाठी निसंकोच पुढे यावे, म्हणून मी आज स्वतः लस घेऊन सुरवात करत आहे, असे मत माजी आमदार अॅड. सदाशिवराव पाटील यांनी व्यक्त केले.

खानापूर तालुक्यात एक मार्च पासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची व्यापक मोहीम सुरू झाली आहे. या मोहिमेअंतर्गत ६० वर्षाच्या वरील जेष्ठ नागरिक आणि ४५ वर्षावरील व्याधीग्रस्त नागरिकांना लसीकरण करण्यात येत आहे. सामान्य लोकांनी या लसीकरणाबाबत भिती बाळगू नये म्हणून माजी आमदार सदाशिवराव पाटील, अशोकभाऊ गायकवाड आणि माजी उप नगराध्यक्ष किरणभाऊ तारळेकर यांनी स्वतः लसीकरण करुन घेतले आहे. 
ज्या पद्धतीने पोलिओ लसी वर आपण विश्वास ठेवला. त्यामुळे पोलिओ हद्दपार झाला. असाच विश्वास कोविशिल्ड या कोरोना प्रतिबंधक लसीवर ठेवा आणि कोरोनाला सुद्धा हद्दपार करा, असे अवाहन अॅड सदाशिवराव पाटील यांनी या लसीचा पहिला डोस घेताना केले यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल लोखंडे व विटा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश लोखंडे उपस्थित होते.
-----------------------------------
कोरोना लस पूर्णतः सुरक्षित....
नागरिकांना दिली जाणारी कोरोना प्रतिबंधात्मक लस पूर्णतः सुरक्षित आहे. तालुक्यात आतापर्यंत जेष्ठ नागरिक आणि ४५ वर्षावरील व्याधिग्रस्त नागरिक अशा १०७ लोकांचे लसीकरण आज अखेर पूर्ण झाले आहे. ग्रामीण रुग्णालयात सकाळी १० ते १ आणि दुपारी ३. ३० ते ५ यावेळेत लसीकरण सुरु असते. तरी ४५ वर्षाच्या वरील व्याधिग्रस्त आणि ६० वर्षाच्या वरील जेष्ठ नागरिकांनी लसीकरण करण्यासाठी यावे. ४५ वर्षाच्या वरील व्याधिग्रस्त नागरिकांनी आपल्या आजाराचे मेडिकल सर्टिफिकेट संबंधित डाॅक्टरांकडून आणणे आवश्यक आहे.

- डाॅ. अनिल लोखंडे
तालुका आरोग्य अधिकारी, विटा. 

Post a Comment

0 Comments