Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

विटा पोलीसात ' कलेक्शन ' चे काम मिळवण्यासाठी जोरदार फिल्डींग


: हप्ता कोणाकडे द्यायचा ? यावरुन संभ्रम

सांगली (राजेंद्र काळे)
अटक केलेल्या संशयित आरोपीला मदत करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच स्वीकारणारे सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप झालटे आणि ' कलेक्शन फेम ' पोलीस शिपाई विवेक यादव लाचलुचपत च्या जाळ्यात अडकल्यामुळे सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली होती. मात्र दोनच दिवसात विवेक यादव याचे ' कलेक्शन ' चे काम मिळविण्यासाठी विटा पोलीस ठाण्यात राजकीय नेतेमंडळीच्या माध्यमातून जोरदार फिल्डींग लावण्यात आल्याची विश्वसनीय माहिती समोर आली आहे.

विटा शहराला गोल्डन सिटी म्हणून ओळखले जाते ते इथल्या कर्तबगार गलाई बांधवांमुळे. मात्र ही गोल्डन सिटी आता सांगली जिल्ह्यातील अवैद्य धंद्यासाठी ओळखली जाऊ लागली आहे. विटा शहरात गेल्या काही वर्षापासून जुगार, मटका अड्डे, खासगी सावकारी, खुलेआम गुटखा विक्री, बसस्थानक परिसरातून बेकायदेशीर प्रवासी वाहतूक, मालवाहतूक वाहनांकडून हप्तेबाजी, चंदन तस्करी या सर्वच गोष्टी खुलेपणाने सुरु आहेत. झालटे- यादव यांच्या लाचखोरी प्रकरणामुळे या सर्व गोष्टी चव्हाट्यावर आल्या. अर्थातच विटा पोलीसांचा एवढा ' स्वच्छ ' कारभार सुरु असताना बदली होऊन गेलेल्या पोलीस निरीक्षक शेळके साहेबांना निरोप देताना झालटे - यादव सारखे पोलीस कर्मचारी भावूक का झाले ? हा प्रश्न सामान्य लोकांना पडलेला आहे.

' कलेक्शन ' मिळविण्यासाठी
जोरदार फिल्डींग...


विटा पोलीस ठाण्याचा ' कलेक्शन ' फेम पोलीस शिपाई विवेक यादव लाचलुचपत च्या जाळ्यात अडकल्यानंतर त्याचे काम मिळविण्यासाठी आता पोलीस कर्मचार्यात मोठी चढाओढ लागल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. कलेक्शनचे काम आपल्यालाच मिळावे, यासाठी काही मटकाबुकीच्या माध्यमातून राजकीय नेतेमंडळीकडे साकडे घातल्याचे सांगितले जात आहे. या महिन्याचा हप्ता कोणाकडे द्यायचा? असा भाबडा सवाल दोन नंबर व्यवसायिक करत आहेत. अर्थातच कलेक्शनचे काम मिळविण्याचा ' विक्रम ' कोण करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

नुतन पोलीस निरिक्षक
यांच्या समोर आव्हान...


नुतन पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी विटा पोलीस ठाण्याचा कारभार हाती घेतला आणि खासगी सावकारीला कंटाळून एकाने आत्महत्या केली. तर दोनच दिवसात याच प्रकरणातील संशयित आरोपीला मदत करण्यासाठी एक लाखांची लाच घेताना सहायक पोलिस निरीक्षक आणि पोलीस शिपाई गजाआड झाले. त्यामुळे विट्यातील अवैद्य धंद्याबरोबरच भ्रष्ट पोलीसांवर कठोर कारवाई करण्याचे आवाहन नुतन पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्यावर आहे

Post a comment

1 Comments