Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

कुपवाड ड्रेनेज योजनेला ग्रीन सिग्नल मिळाला : महापौर दिग्विजय सुर्यवंशी

सांगली (प्रतिनिधी) : पालकमंत्री जयंत पाटील यांच्या दालनात झालेल्या बैठकित कुपवाड ड्रेनेज योजनेचा प्रश्न मार्गी लागला आहे. नगरविकासचे सचिव शाम जाधव यांनी या योजनेला ग्रीन सिग्नल दिला आहे, अशी माहिती महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांनी दिली आहे. 

मुंबई येथे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या दालनात सांगली महापालिका क्षेत्रातील नियोजीत कुपवाड ड्रेनेज योजना, सुधारीत शेरीनाला योजना, आपत्ती व्यवस्थापन केंद्र यासह अन्य प्रकल्पासंदर्भात बैठक झाली. या बैठकीस महापौर दिग्विजय सूर्यवंशी, उपमहापौर उमेश पाटील, आयुक्त नितीन कापडणीस, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, युवा नेते विशाल पाटील, राष्ट्रवादीचे नेते शेखर माने, राहुल पवार, गटनेते मैनुद्दीन बागवान, नगरसेवक विष्णू माने यांच्यासह नगरविकास, मदत व पुनर्वसन तसेच पर्यावरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

महापौर सूर्यवंशी म्हणाले, कुपवाड ड्रेनेज योजनेसाठी २५० कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. नगरविकासचे सचिव शाम जाधव यांच्या उपस्थितीत या योजनेचा सखोल आढावा घेण्यात आला. शासनाने या योजनेला ग्रीन सिग्नल दिला आहे. तात्काळ आराखड्यासहीत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. याशिवाय महापूर काळात शाळा, महाविद्यालयात निवारा केंद्रे सुरु करण्याची वेळ महापालिकेवर येते. याची दखल घेत आपत्ती व्यवस्थापनांतर्गत सांगली दोन व मिरज शहर येथे एक अशी तीन निवारा केंद्रे उभा करण्यात येणार आहेत. बैठकीत सचिव असिमकुमार गुप्ता यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. सुधारीत शेरीनाला प्रकल्पाबाबतही चर्चा झाली.

महापुराच्या काळात पाण्याचा निचरा करण्यासाठी शहरात पंपीग स्टेशन बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कृष्णेचे शुध्दीकरण करुन सांगलीकरांना शुध्द व स्वच्छ पाणी पुरवठा करण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments