Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

चैतन्यमय जीवनयात्री : डॉ. पतंगराव कदम

 

सांगली (प्रतिनिधी)
छत्रपती शिवाजी, राजर्षी शाहू, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, बापूजी साळुंखे, यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई तसेच यशवंतराव मोहिते यांच्यासारख्या दुरदृष्टया व्यक्तिमत्वांनी आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये पुरोगामी व परिवर्तनवादी विचार रुजवण्यासाठी जे कार्य केले. त्या कार्य व संस्कारांना शोभणारे तसेच पूरक व पोषण करून वाढवणारे कार्य त्यांच्यानंतरच्या पिढीत जर कोणी केले असेल, तर ते आपणा सर्वांचे अमरत्व प्राप्त झालेले डॉ. पतंगराव कदम होत.

अतिशय तरुण वयामध्ये अक्षरशः शून्यातून विश्व निर्माण करणारे इतिहासामध्ये काही मूठभर लोक आहेत. त्यांनी परिश्रम, विचार, विद्वतेच्या आधारावर काळ बदलून टाकण्याचे विचार मांडले. त्यामध्ये पतंगराव कदमसाहेबांची गणना अगदी सहजरित्या होऊ शकते. सोनसळसारख्या छोट्या, कोरडवाहू, दुष्काळी गावातील मोठ्या कुटुंबात जन्म घेऊनसुद्धा हाल, अपेष्ठा, दारिद्र्य यावर मात करत पराक्रम करण्याची जिद्द मनामध्ये बाळगून विश्वाशी झुंज देणारा कर्मयौद्धा हे वर्णन साहेबांना साजेसे आहे. वारकरी सांप्रदायात बालपणापासून वावरले असल्यामुळे जय-पराजय या गोष्टींना समानतेने सामोरे जाण्याची क्षमता असणारा, माणसांमधील माणुसकी राखणारा, गर्व, अहंकार, इर्षा, मत्सर या सगळ्या भावना त्यागून माळ न घातलेला वारकरी म्हणून साहेब गणले पाहिजेत. 

ज्ञान व समाजाच्या दिंडीमध्ये सामील होऊन समाजाला परावर्तित करण्यासाठी बाहेर पडलेला धाडसी नेता असे साहेबांबद्धल वर्णन करण्याची इच्छा पदोपदी होते. कधीही छोटी संधी मिळाली तरी ती स्वीकारून हसतमुख, यशस्वीपणे पार पाडून आपला ठसा उमटवण्याची क्षमता त्यांनी एस. टी बोर्ड मेंबरद्वारे महाराष्ट्रभर केली. राज्य परिवहन मंडळाचा राज्यभर विस्तार करण्याची तयारी दर्शवली. ज्या-ज्या थोर माणसांच्या सानिध्यात ते आले. त्यांच्यातील सुगुण त्यांनी अंगिकारले. व स्वतःमध्ये सातत्याने सुधारणा करण्याची वृत्ती निर्माण केली. त्यामुळे प्रत्येक अनुभवातून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक वेगळा पैलू त्यांनी घडवला.

पतंगराव कदम साहेब म्हणालं, तर अर्थातच मनामध्ये भारती विद्यापीठाची महत्वाकांक्षी स्थापना, विस्तार, वृद्धी, असंख्य शाखांमध्ये रूपांतर व शेवटी अभिमत विश्वविद्यालय निर्माण करण्याचा पराक्रम हा मनामध्ये येतोच. परंतु त्याहून अधिक या साम्राज्यस्वरूपी विकासामध्ये राबणाऱ्या प्रत्येक माणसाच्या हृदयस्पंदनामध्ये प्रेम, आपुलकी, निष्ठा व मायेवरच्या ताकदीवर जे स्थान निर्माण करून हजारो लोकांचे संसार त्यांनी उभा केले. ही कामगिरी अद्वितीय आहे. जगाच्या पाठीवर दोनच अशा गोष्टी आहेत. ज्या लुटल्याने वाढतात. एक प्रेम आणि दुसरी विद्या. ह्या दोन्हीही गोष्टी त्यांनी सढळ हाताने, मनमोकळेपणाने समाजाला अर्पित केल्या. व गरजूंना मदतीची उधळण करत हा वारकरी त्यांच्या मनातील प्रेमाच्या पंढरीपर्यंत पोहचला. 

पतंगराव कदम साहेबांचे आमच्या वडिलांच्या मनामध्ये एक विशेष स्थान होते. असंख्य लोकांना भाऊंनी मदत केली. परंतु दिलेल्या संधीची जाण राखून चढत्या, पडत्या आणि शेवटच्या काळापर्यंत मान-सन्मानाने बिनशर्त त्यांनी भाऊंच्या पाठिशी राहण्याची जी भूमिका पत्करली. ती मात्र भाऊंच्या आयुष्यामध्ये शिष्याने दिलेली सगळ्यात मोठी उपलब्धी होती. विद्यापीठामध्ये तहहयात भाऊंनी अध्यक्ष म्हणून आपल्या ह्या उच्च कर्तबगारीच्या विद्यार्थ्याचा प्रवास बघितला. व भाऊंच्या शेवटच्या क्षणापर्यंत पतंगरावांच्या घडवणुकीमध्ये जो वाटा त्यांनी उचलला. त्याबद्धल त्यांना सार्थ अभिमान राहिला. अगदी पडत्या काळामध्ये भाऊंनी मला सांगितले होते की, रक्तामासाच्या नात्यापेक्षा विचार आणि तत्वज्ञानाचे जे साहेबांशी नाते आहे. ते त्यांच्यानंतरही मी राखले पाहिजेत. व अंततः त्याचा परिचय सुद्धा मला आला. मोठ्या अडचणीच्या माझ्या काळामध्येसुद्धा भाऊंच्या अनुपस्थितीत साहेब व काकीसाहेबांनी मला आई-वडिलांची उणीव भासू दिली नाही. आजसुद्धा साहेब जरी काळाच्या पडद्याआड गेले असले तरी, ते माझ्या आठवणीत, माझ्या विचारात, माझ्या तत्वज्ञानात कायमस्वरूपी जिवंत आहेत. ह्यातच त्यांची थोरवी आणि त्यांचे अमरत्व प्राप्त आहे. परंतु आयुष्य हे आळवावरचे पाणी आहे. आज आहे तर उद्या नाही. हे त्रिकालबाधित सत्य जरी साहेबांच्या बाबतीत वास्तव झाले असले, तरी त्यांची पुनरावृत्ती, प्रतिकृती ही मला माझ्या धाकट्या बंधू विश्वजित कदमांमध्ये दिसते. जे नातं भाऊ व साहेबांचे होते. जे काम त्या दोघांनी चालू केले. ज्या समाजपरिवर्तनाचा ध्यास झपाटल्यासारखा पाठपुरावा करून वास्तव्यात आणला. त्याला टिकवून वाढवण्यासाठी व पुढे नेण्यासाठी तितक्याच आपुलकी आणि प्रेमाने विश्वजित आणि इंद्रजित काम करत राहतील. ही दिक्षा आणि समाजाच्या प्रती व्रत आम्हास प्राप्त आहे. व त्यासाठी तपश्चर्या आम्ही दोघेही येथूनपुढे काम करत राहू. कारण आमचे कार्यच साहेबांच्यासाठी चिरंतर पूजा आहे.

- डॉ. इंद्रजित मोहिते, 
उपाध्यक्ष, भारती विद्यापीठ पुणे.


Post a Comment

0 Comments