Daily Mahasatta

Daily Mahasatta

इस्लामपूरातील खून प्रकरणी तिघांना अटक

इस्लामपूर : खुनातील संशयितांसमवेत कृष्णात पिंगळे, नारायण देशमुख यांच्यासह पोलीसपथक.

इस्लामपूर, ( प्रतिनिधी )
केवळ दारू आणि चैनीसाठी पैसे मिळावेत यासाठी एका निष्पापाचा खून करणाऱ्या तिघा नराधमांच्या मुसक्या आज पोलिसांनी आवळल्या. रविवारी रात्री राजेश सुभाष काळे (वय ३५, रा. नेहरूनगर, इस्लामपूर) या निष्पाप कामगाराचा खून करणाऱ्या बंडा उर्फ संदीप शिवाजी कुटे (वय २२, रा लोणार गल्ली), ऋत्विक दिनकर महापुरे (वय २१, रा खांबे मळा) व अनिल गणेश राठोड (वय २६, रा. लोणार गल्ली, इस्लामपूर) या तिघांना पोलिसांनी आज अटक केली. अतिशय गुंतागुंतीच्या असलेल्या या दुष्कृत्याचा छडा लावण्याचे मोठं आव्हान इस्लामपूर पोलिसांपुढे होते. शहरात नव्यानेच जिल्हा विकास नियोजन च्या माध्यमातून बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने या खुनाचा उलघडा करण्यात पोलिसांना यश आले.

रविवारी (ता. ७) रात्री कापुसखेड रस्त्यावरील निर्जन ठिकाणी राजेश काळे याचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून झाला होता. सोमवारी सकाळी खुनाचा प्रकार उघडकीस आल्यावर पोलिसांनी तपासाला गती दिली. गेल्या दोन दिवसांपासून पोलीस या खुनाचा छडा लावण्यात व्यस्त होते. शहरात नव्यानेच बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने या खुनाचा तपास करण्यात पोलिसांना यश आले.

या खुनाच्या तपासाबाबत माहिती देताना उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे म्हणाले, "या खुनाचा तपास करणे आव्हानात्मक होते. कोणताही क्लयू नसताना इस्लामपूर पोलिसांच्या पथकाने छडा लावला. रविवारी सकाळी मृत राजेश काळे याने त्याच्या मालकाकडून आठवड्याचा पगार दोन हजार रुपये घेतला. त्यानंतर काळेच्या आईची कर्णफुले ज्याच्याकडे गहाण होती, त्याच्याकडून ती आणण्यासाठी तो, त्याची आई व अन्य एकजण असे तिघे पाटण तालुक्यातील नवा रस्ता येथे गेले. तो भेटला नाही म्हणून परत आले. मालकाकडून पैसे घेतल्याने तो सकाळी, दुपारी दारू पिला होता. नवा रस्ता येथून रात्री पावणे ९ वाजता तो इस्लामपुरात आला. त्यानंतर कचरे गल्ली परिसरातील एका दारूच्या दुकानात त्याने पुन्हा दारू घेतली. दारू जास्त झाल्याने दुकानाच्या बाहेरच नशेत पडला. दरम्यान कुटे याच्यावर दारू पिऊन वाहन चालवल्याने पोलिसांनी कारवाई केली होती. कुटेने राठोड व महापुरे याना गाडीवरून नेण्यासाठी पोलीस ठाण्यात बोलवले. रात्री अकराच्या सुमारास हे तिघे दुचाकीवरून तिथून जात असताना राजेश काळे नशेत पडल्याचे त्यांना दिसले. दारू पिऊन पडलेल्या काळेच्या खिशात पैसे असणार या उद्देशाने या तिघांनी त्याला उठवला. संदीप कुटेने त्याचे खिसे तपासले. राजेश दंगा करेल या भीतीने तिघांनी त्याला दुचाकीवर घेतले. तिथून चौघे मिळून कापुसखेड रोडला गेले. निर्जन ठिकाणी गेल्यावर गाडी थांबवून त्याच्याकडील पैसे लुटायचे या उद्देशाने त्याची पॅन्ट काढून पैसे, मोबाईल काढून घेतले. काळेने या गोष्टीची कुठे वाच्यता करू नये म्हणून त्याच्या डोक्यात लोखंडी गजाने प्रहार केला. त्यानंतर राजेश काळे जिवाच्या आकांताने तिथून पळत सुटला. त्याच्या हातातील गुलाबी रंगाच्या पिशवीतील वांगी, मक्याची कणसे घटनास्थळी विस्कटून पडली होती. डोक्यात प्रहार झालेला असताना तो शंभर मीटर अंतर रक्ताच्या चिळकांड्या उडत असतानाही पळत सुटला. तरीही या तिघांनी त्याला गाठून त्याच्या डोक्यात दगड घालून त्याला ठेचून ठार केले.

या सर्व घटनेला एकही प्रत्यक्षदर्शी पुरावा उपलब्ध नव्हता; त्यामुळे या खुनाचा तपास करणे पोलिसांसमोर आव्हान होते. गेले 3 दिवस पोलिसांनी अविश्रांत काम करून शहरातील सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत या खुनाचा छडा लावला. कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, भानुदास निंभोरे, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे, दीपक ठोंबरे, शरद जाधव,अरुण पाटील, अमोल चव्हाण, प्रशांत देसाई, सचिन यादव, आलमगीर लतीफ, गणेश शेळके, सुरज जगदाळे, उमेश राजगे, योगेश जाधव, श्री. गुंडेवाल या पथकाने खुनाचा छडा लावला.
-----------------------
पिवळा पट्टा ठरला महत्त्वाचा दुवा :

या खुनात वापरलेली मोटारसायकल पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसली, मात्र गाडीवर नंबरप्लेट नसल्याने ओळखणे अवघड होते. या गाडीच्या मागे तीन इंच रुंदीचा पिवळा पट्टा होता, तो फुटेजमध्ये दिसल्यावर त्यावरून पोलिसांनी गाडी आणि हे आरोपी शोधून काढले.
-----------------------
मारेकरी सराईत :

मारेकरी सराईत गुन्हेगार आहेत,त्यांच्यावर घरफोडी, राष्ट्रीय महामार्गावरील लूटमार, चोऱ्या असे अनेक गुन्हे दाखल आहेत. हे तिघेही गुंड रवी खोत याच्या टोळीत काम करतात. खोतवर 2 खून आणि इतर 18 गुन्हे दाखल आहेत.
-----------------


Post a Comment

0 Comments