Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगलीचे माजी आ. संभाजी पवार यांचे निधन

सांगली (प्रतिनिधी)
:  सांगली विधानसभा मतदार संघातून तब्बल चार वेळा आमदार झालेले आणि संपूर्ण महाराष्ट्रात बिजलीमल्ल म्हणून प्रसिद्ध असलेले माजी आमदार  संभाजी आप्पा पवार (वय - ८० ) यांचे रविवार रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सांगलीच्या अमरधाम स्मशानभूमी येथे सोमवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

वज्रदेही मल्ल हरी नाना पवार यांचे पुत्र म्हणून संभाजी आप्पांचा नावलौकिक होता. त्याचबरोबर कुस्ती क्षणार्धात निकाली लावण्याच्या गुणामुळे त्यांना बिजली मल्ल हा किताब जनमानसातून मिळाला. जनता दलाच्या स्थापनेनंतर वसंतदादा पाटील यांच्या हयातीत त्यांनी सांगली विधानसभेची पहिली निवडणूक लढवली, आणि विष्णुअण्णा पाटील यांचा पराभव केला. त्यानंतर याच पक्षाच्या चिन्हावर त्यानी हॅट्रिक केली.

सन २००९ साली त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपच्या वतीने याच मतदारसंघातून आमदार झाले. जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. सांगली महापालिकेत महाआघाडीच्या माध्यमातून त्यांनी सत्तेचा खांदेपालट केला होता.

सांगलीतील भाजपच्या स्थानिक राजकारणातून ते पक्षावर नाराज झाले. त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न अनेकदा झाला पण त्यामध्ये यश आले नाही. शेवटी त्यांनी राजकारणातून निवृत्ती स्वीकारली. गतवर्षी त्यांना कोरोनाची बाधा झाली होती. मात्र ते कोरोनावर मात करत ठणठणीत झाले होते. सांगली मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यातील रिक्षा चालक, कामगार, किरकोळ विक्रेते यांचे नेते म्हणून ओळखले जात. त्यांच्या पार्थिवावर सांगलीच्या अमरधाम स्मशानभूमी येथे सोमवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्चात पत्नी, सर्वोदय कारखान्याचे चेअरमन पृथ्वीराज पवार, माजी नगरसेवक गौतम पवार हे दोन पुत्र, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
--------------------

सक्षम विरोधी नेता...

संभाजी पवार तथा आप्पा यांनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडून एक सक्षम विरोधी नेता म्हणून राज्यभरात नावलौकिक मिळवला. तसेच आमदार झाल्यानंतर गोरगरीब, सामान्यांची कामे करुन लोकप्रियता मिळवली. त्यांची कामगिरी नेहमीच जनतेच्या स्मरणात राहिल.

आ. चंद्रकांतदादा पाटील
प्रदेशाध्यक्ष, भाजप
Post a Comment

0 Comments