Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

पवित्र पोर्टलद्वारे नोकर भरती बंद करा: रावसाहेब पाटील

सांगली (राजेंद्र काळे)
पवित्र पोर्टल बंद करुन खासगी शिक्षण संस्थांचा नोकर भरतीचा घटनात्मक अधिकार पूर्ववत संस्थांना दिला पाहिजे अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे खजिनदार व सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी केली आहे.

पाटील म्हणाले, खासगी शिक्षण संस्थांचा शिक्षक भरतीचा अधिकार हा कायद्याने दिलेला हक्क आहे. बहुजन शिक्षणाचे जे रचनात्मक काम शासनाला जमणार नाही ते खासगी शिक्षण संस्था करीत आहेत. महाराष्ट्र राज्य खासगी शाळा अधिनियम व नियमावलीनुसार शिक्षक भरती हा खासगी संस्थांचा कायदेशीर हक्क आहे. त्यावर शासनाने अतिक्रमण करुन पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती सुरू केली. आता पवित्र पोर्टल भरती ही सपशेल अपयशी ठरली आहे. विधीमंडळात पुणे पदवीधर आमदार मा. अरुण लाड यांनी हा मुद्दा उपस्थित करून कोणत्याही परिस्थितीत पवित्र पोर्टल बंद करुन खासगी शिक्षण संस्थांचा नोकर भरतीचा घटनात्मक अधिकार पूर्ववत संस्थांना दिला पाहिजे अशी जोरदार मागणी केली आहे ते उचित व न्याय मागणी आहे. आम्ही खासगी शिक्षण संस्था संघातर्फे मा. अरुण लाड यांचे हार्दिक अभिनंदन करतो, असे रावसाहेब पाटील यांनी म्हटले आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे व स्वातंत्र्यानंतरच्या काळात खासगी शिक्षण संस्थांनी प्राथमिक, माध्यमिक व उच्च आणि उच्च व तंत्र शिक्षणात मोठी गुंतवणूक करुन बहुजन समाजातील विविध घटकांचे शिक्षण उत्कृष्टपणे केले आहे. इमारत, क्रीडांगण, प्रयोगशाळा, शैक्षणिक साहित्यसाधने, फर्निचर, क्रीडासाहित्य इ. बाबीवर अब्जावधी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

जर शिक्षक भरती बाहेरुन झाली तर शिक्षण संस्थांचे शालेय व शैक्षणिक प्रशासन व संघटन विस्कळीत होऊन शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम झाल्याने महाराष्ट्राची न भरुन येणारी हानी होईल यासाठी शिक्षक भरती ही संस्थांच्या अधिकारात राहणे सर्वांच्या हिताचे आहे याचा शासनाने गांभीर्याने विचार करावा व संस्थांचा हा कायदेशीर अधिकार पूर्ववत ठेवावा. आम. अरुण लाड यांनी केलेल्या मागणीस तमाम सर्व संस्थाचालकांची पाठिंबा असल्याचे महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे खजिनदार व सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी सांगितले.

Post a comment

0 Comments