Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

इस्लामपूरातील बंड्या कुटे गँगवर मोक्का अंतर्गत कारवाई

इस्लामपूर, (सूर्यकांत शिंदे )
काही दिवसांपूर्वीच सेंट्रींग कामगार राजेश सुभाष काळे (वय ३५, रा. नेहरूनगर, इस्लामपूर, मुळगाव-बावची) यांच्या खुनाच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या संदीप उर्फ बंड्या कुटे याच्यासह त्याच्या गॅंग मधील अन्य दोघांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पोलीस निरीक्षक नारायण देशमुख उपस्थित होते. मोक्काअंतर्गत इस्लामपूर विभागातील ही सातवी कारवाई करत गुन्हेगारी जगताला पोलिसांनी हादरा दिला आहे.

श्री. पिंगळे म्हणाले, "जिल्हा पोलिसप्रमुख दीक्षीत गेडाम, अप्पर पोलिस अधिक्षक मनिषा दुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगारांच्या मुसक्या आवळत कडक कारवाई करण्यात आल्या आहेत. इस्लामपूरसह परिसरातील सोन्या शिंदे टोळी, अनमोल मदने टोळी, कपिल पवार टोळी, उदय मोरे टोळी आष्टा, पारधी गँग, अज्या मेहरबान गँग आणि नुकतीच कारवाई केलेल्या संदिप शिवाजी कुटे उर्फ बंडया कुटे (वय २२ रा. लोणार गल्ली इस्लामपूर), ऋत्वीक दिनकर महापुरे (वय २१ रा. खांबे मळा इस्लामपूर), अनिल गणेश राठोड (वय २६ मुळ गाव ऐनापुर, जि. विजापूर) यांच्यावर इस्लामपूर, कासेगाव या ठिकाणच्या नागरी वस्तीत वर्चस्व प्रस्थापित करून निव्वळ आर्थिक लाभाकरीता खून, गंभीर दुखापतीसह जबरी चोरी, घरफोडी अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत.

कुटे या टोळीवर पाच गुन्हे पोलिसात दाखल आहेत. ८ मार्चला त्यांच्यावर इस्लामपूर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल होता. तिघांनी एका दारूच्या दुकानाच्या बाहेर नशेत पडलेल्या राजेश काळे यांच्याकडून पैसे काढण्याच्या हेतूने लांब घेऊन गेले आणि हा प्रकार तो कुणाला सांगेल या भीतीने डोक्यात रॉडने व नंतर दगडाने ठेचून त्याचा खून केला होता. मोठया हुशारीने शहरात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या सहाय्याने या तिघांना अटक करण्यात यश आले होते. अटक झाल्यानंतर तिघांनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे. या टोळीविरूध्द पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी उपविभागीय कार्यालयामार्फत जिल्हा पोलिस प्रमुखांच्याकडे मोक्का अंतर्गत कारवाईसाठी प्रस्ताव सादर केला होता. त्यास विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी मंजूरी दिली आहे."
-----------------------

सात टोळ्यांना मोक्का

कृष्णात पिंगळे यांनी इस्लामपूर मधील पदभार स्वीकारल्यावर मोकांतर्गत १० कारवाया करण्याचा निश्चय केला होता. आत्तापार्यंत २ वर्षात इस्लामपूर शहरातील सहा व आष्ट्यातील एक अशा सात टोळ्यांवर मोक्काची कारवाई केली आहे. यामध्ये सौन्या शिंदे गॅंग, अनमोल मदने गॅंग, कपिल कृष्णा पवार, उदय रघुनाथ मोरे (आष्टा), पारधी मुक्या पवार गॅंग, आज्या मेहेरबान गॅंग आणि आताची बंडा कुटे गॅंग अशा सात टोळ्यांमधील एकूण ४० जणांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई झाली आहे.

Post a comment

0 Comments