Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

सांगलीच्या काळ्या खणीत लवकरच बोटिंग सुरु होणार : आयुक्त कापडणीस

सांगली ( राजेंद्र काळे )
सांगलीच्या वैभवात भर घालणाऱ्या काळ्या खणीत लवकरच बोटिंग सुरू होणार असल्याची माहिती मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली. याचबरोबर काळी खण सुशोभीकरणअंतर्गत उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉइंटला जनतेचा प्रतिसाद मिळत असून रंगीबेरंगी कारंजाही सुरू करण्यात आला आहे. सर्वांच्या मदतीने काळ्या खणीचे रुपडे लवकरच पालटणार असल्याचेही नितीन कापडणीस यांनी सांगितले.

काळ्या खणीच्या शुभिकरणाबाबत अधिक बोलताना आयुक्त कापडणीस म्हणाले की, सांगलीच्या मध्यवर्ती असणाऱ्या काळ्या खणीत सुशोभीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षोपासून रखडलेले होते. या खणीचे सुशोभिकरणाबाबत तातडीने पाऊले उचलण्यात आली. पहिल्या टप्प्यात काळ्या खणीतील कचरा बाजूला केला जात आहे. याचबरोबर आता मुख्य दर्शनी भागावर आय लव्ह सांगली असा सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला आहे. काळ्या खणीमध्ये बसवण्यात आलेला रंगीबेरंगी कारंजाही सुरू करण्यात आला आहे. यामुळे या सेल्फी पॉइंटवर नागरिक काळ्या खणीचे सौन्दर्य पाहण्यासाठी येत आहेत.

काळ्या खणीला कंपाउंड नसल्याने तिथे अपघाताची शक्यता होती. त्यामुळे तातडीने पश्चिम बाजूच्या मुख्य रस्त्या लागत तारेचे कंपाउंड उभारण्यात आले. यामुळे कोणतेही दुर्घटना होणार नाही याची दक्षता प्रशासनाने घेतली आहे. आता सांगलीकर जनतेच्या मागणीनुसार लवकरच काळी खण सुशोभीकरण अंतर्गत बोटिंगची सुविधा सुरू केली जाणार आहे. त्यामुळे काळ्या खणीमध्ये नागरिक जल पर्यटन करू शकतील असे नियोजन सुरू आहे. याचबरोबर संपूर्ण खणीच्या चोहोबाजुनी आकर्षक विद्युत व्यवस्था सुद्धा करण्याचे नियोजन आहे. काळी खण रोषणाईने उजळून निघेल आणि यामुळे हे एक सांगलीतील चांगले पर्यटन स्थळ म्हणून समोर येईल अशी खात्री आहे.

याचबरोबर सेल्फी पॉईंटजवळ आणि बोटिंग पॉईंटजवळ खाऊ गल्ली करण्याचे नियोजन सुद्धा सुरू आहे. यासाठी सर्व सांगलीकर जनता, लोकप्रतिनिधी यांची मदत आणि साथ मिळत असल्याचे मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी शेवटी सांगितले.

Post a comment

0 Comments