Daily Mahasatta

Daily Mahasatta

शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचा मोदी सरकारचा डाव : डाॅ. विश्वजीत कदम

शेतकऱ्यांच्या विरोधातील तीन काळे कायदे रद्द करावेत या मागणीसाठी काँग्रेस पक्षातर्फे काँग्रेस भवन समोर शुक्रवारी सहकार व कृषी राज्यमंत्री ना. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली उपोषण करण्यात आले.

सांगली, (प्रतिनिधी)
केंद्र सरकारने लादलेले तीन काळे कृषी कायदे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे असल्यामुळे ते तातडीने रद्द करावेत, इंधन दरवाढ मागे घ्यावी या मागणीसाठी आज काँग्रेसच्यावतीने सांगलीत काँग्रेस भवनसमोर उपोषण करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व सहकार व कृषी राज्यमंत्री ना. विश्वजीत कदम, आमदार मोहनराव कदम, शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जयश्रीताई पाटील, शैलजाताई पाटील, विशाल पाटील, निरीक्षक सचिन नाईक आदींनी केले.

मोदी सरकारने लादलेले तीन काळे कृषी कायदे रद्द करावेत तसेच इंधन दरवाढ रोखावी या मागणीसाठी शेतकरी संघटनांनी आज भारत बंद पुकारला आहे. या बंदला काँग्रेस पक्षाने उपोषणाच्या माध्यमातून सक्रिय पाठिंबा दिला.

यावेळी बोलताना ना. विश्वजीत कदम म्हणाले, केंद्रातील भाजपा सरकारने तीन कृषी कायदे लोकसभेत जबरदस्तीने मंजूर केले आहेत. त्यावर कुठलीही चर्चा झाली नाही. या कायद्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. या कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर लाखो शेतकरी गेले चार महिने आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारने त्यांच्याशी चर्चा करण्याचे नाटक केले, परंतु कायदे मागे घेण्याबाबत कुठलाही निर्णय घेतला नाही की, शेतकऱ्यांना विश्वासात घेतले नाही. आंदोलनाच्या ठिकाणी तीनशेहून अधिक शेतकरी शहीद झाले, त्याचीसुद्धा त्यांनी दखल घेतली नाही. शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचाच मोदी सरकारचा डाव आहे.

ते म्हणाले, हे अन्यायी कायदे रद्द करावेत, यासाठी काँग्रेसच्या नेत्या श्रीमती सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशभर तसेच महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ना. बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि ना. अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने आंदोलने चालू आहेत. आजही संपूर्ण महाराष्ट्रात उपोषण केले जात आहे, त्यात लाखो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

ते म्हणाले, महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात अधिकाऱ्यांना हाताशी धरून भाजपचे नेते कटकारस्थान करत आहेत. फोन टॅपिंगचे प्रकरण त्याचाच एक भाग आहे. महागाई, गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्याचे सोडून त्यांनी हे उद्योग चालवले आहेत. काहीही करून प्रसिद्धी मिळवण्याचा त्यांचा उद्योग सुरू आहे.

यावेळी पैलवान नामदेवराव मोहिते, उपमहापौर उमेश पाटील, मंगेश चव्हाण, बाळासाहेब गुरव, आप्पासाहेब पाटील, आशा पाटील, वहिदा नाईकवडी, दिलीप पाटील, अजित भोसले, अजित ढोले, अजित शिरगावकर, सुभाष खोत, सदानंद जवळगे, सुवर्णा पाटील, मालन मोहिते, वैशाली वाघचौरे, बिपिन कदम, अण्णासाहेब कोरे, संजय मेंढे, वसीम रोहिले, प्रताप चव्हाण, शुभांगी साळुंखे, फिरोज पठाण, आरती वळवडे, मनोज सरगर, अमर निंबाळकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.


Post a Comment

0 Comments