Daily Mahasatta

Daily Mahasatta

नितीन चौगुले यांचे ' शिवप्रतिष्ठान ' बाबत खळबळजनक गौप्यस्फोट

सांगली ( मनोज देवकर )
आपण कुठल्याही प्रकारचे मानधन, वर्गणी कधी कुणाला मागितली नाही. निस्वार्थपणे काम केले. गेल्या पाच सहा वर्षात गुरुजींना नावं ठेवणारे लोक प्रतिष्ठान मध्ये कार्यरत झाले आहेत. माझे कोणतेही दोन नंबर चे धंदे नाहीत. माझ्या कोणत्या भानगडी नाहीत. भीमा कोरेगाव आणि इतर प्रकरणात गुरुजींना लक्ष केले जात होते. तेंव्हा मी अनेक संघटनांशी संघर्ष केला. संघटनेत असे नग आहेत ज्यांना शिवप्रतिष्ठान च्या मान सन्मानाशी घेणे देणे नाही. एक वाळू तस्कर सक्रिय आहे. गाडी पकडली की ते गुरुजींना घेऊन तहसीलदार प्रांत पासून महसूल मंत्र्यांना भेटतात, असा आरोप नितीन चौगुले यांनी केला.

भिडे गुरुजींच्या भोवतीच्या चांडाळ चौकडीने मला बदनाम केले. सर्वांना बाजू मांडण्याची संधी मिळते. मला मात्र ती संधीही देण्यात आली नाही. देव , देश आणि धर्मासाठी मी गेली वीस वर्षे शिवप्रतिष्ठान चे काम केलं. एक चारचाकी आणि आठशे स्क्वेअर फूट चा बंगला सोडला तर माझ्याकडे कोणतीही संपत्ती नाही असे स्पष्टीकरण शिवप्रतिष्ठान मधून बडतर्फ करण्यात आलेले नितीन चौगुले यांनी सांगली येथे समर्थकांच्या मेळाव्यात दिले.

शिवप्रतिष्ठान संघटनेतून निलंबित करण्यात आलेल्या नितीन चौगुले आणि त्यांच्या समर्थकांचा मेळावा आज सांगली येथे झाला. यावेळी तासभर केलेल्या भाषणात चौगुले यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले. त्यामुळे शिवप्रतिष्ठान मधील वाद चव्हाट्यावर आले आहेत.

यावेळी बोलताना चौगुले म्हणाले 'जुगार खेळताना पोलिसांना सापडलेल्या एका धारकऱ्याला मी सोडवला. त्याने 'मी गोरक्षा करतो म्हणून मुस्लिमांनी मला अडकवले असा बनाव करण्याचा प्रयत्न केल्याचा " खळबळ जनक खुलासा चौगुले यांनी केला. एका धारकऱ्यांने आर्थिक संस्था काढून लोकांचे पैसे थकवले. ठेवीदार मोर्चा काढणार होते. तर त्याने गुरुजींना ठेवीदारांच्या दारोदार फिरवले. गुरुजींनी आपला कार्यकर्ता आहे म्हणून विनंती करून कारवाई होऊ दिली नाही. काहीजण नगरसेवक , आमदारकीचे , खासदारकीचे तिकीट मिळवण्यासाठी गुरुजींचा वापर करतात.

ते म्हणाले, एकजण इतरांच्या जमिनीवर कब्जा करून बोर्ड लावण्याचे काम करतो. पैसे उकळून प्रकरण मिटवण्याचे प्रकार करतो. अशी लोकं गुरुजींच्या अवतीभोवती आहेत. माझ्यावर अनेक आरोप करण्यात आले. शेवटी माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगून शिवप्रतिष्ठान च्या कार्यकर्त्यांसाठी मी कायम मदतीला धावून येईन असे वचन त्यांनी जमलेल्या समर्थकांना दिले. प्रतिष्ठिन चा कार्यकर्ता बार मध्ये , चौकामध्ये दिसता कामा नये असे आवाहन त्यांनी केले.

मी माझी संपूर्ण कारकीर्द शिवछत्रपती आणि भगव्या ध्वजासाठी अर्पण केली आहे. सांगलीत नैसर्गिक आपत्तीच्या वेळी धारकऱ्यांना सोबत घेऊन उभा राहिलो. देशभरातून जमवलेली मदत निस्वार्थपणे प्रत्येक गरजूंपर्यंत पोहचवली. सर्व पक्षांशी समन्वय ठेवण्याचा प्रयत्न केला. गुरुजी सांगतील तिथे प्रतिष्ठान चे काम प्रामाणिकपणे केले असे चौगुले म्हणाले.

संभाजी भिडे गुरुजी यांच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे कार्यवाहक नितीन चौगुले यांना संघटनेचे अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी पदावरून तडकाफडकी हटवले. याबाबतचा एक व्हिडिओ त्यांनी सोशल माध्यमात पोस्ट केला होता.

काही आठवड्यापूर्वी शरजील उस्मानी आणि एल्गार परिषद याविरोधात शिवप्रतिष्ठानकडून सांगलीत आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात नितीन चौगुले हे अग्रभागी होते. या आंदोलनानंतर अचानक चौगुले यांना पदावरून बडतर्फ करण्यात आले. शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी चौगुले यांच्यावर कारवाई केल्याची माहिती एका व्हिडीओच्या माध्यमातून दिली होती . चौगुले यांच्याशी संघटनात्मक पातळीवर कुणीही संबंध ठेवू नयेत, असेही त्यांनी सांगितले होते . ही कारवाई करताना कोणतेच ठोस कारण त्यांनी दिले नाही. देसाई यांचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आणि संभाजी भिडे यांच्या संघटनेत फूट पडल्याच्या बातम्या सर्वत्र झळकल्या होत्या.

Post a Comment

1 Comments

  1. शिवप्रतिष्ठानचे लोक किती नीतिमान आहेत ते समजले. आंब्याची पैदास घाणच निघाली शेवटी.

    ReplyDelete