Daily Mahasatta

Daily Mahasatta

पोलिसांच्या कारवाई नंतर आळसंद मधील आंदोलन तात्पुरते स्थगित

विटा (मनोज देवकर)
आळसंद (ता. खानापूर) येथे ग्रामपंचायत कर वसुली व कामकाजात जाणूनबुजून अडथळा आणणार्‍यांविरुद्ध कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी सोमवार दि.1 फेब्रुवारी रोजी सरपंच सौ. इंदूमती जाधव, माजी उपसरपंच नितीनराजे जाधव, ग्रा. पं. सदस्य संदिप बनसोडे व भरत हारुगडे यांच्यावतीने ग्रा. पं. कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले होते. 
याप्रकरणातील संबंधित दोषी व्यक्तींवरती कारवाई करण्याचे आदेश अप्पर पोलिस अधिक्षक यांनी दिले होते. त्यानुसार हिम्मत बाजीराव जाधव, खंडेराव लक्ष्मण जाधव, अभिनंदन हिम्मत जाधव, विक्रम युवराज जाधव, जयदिप जयसिंग पाटील व संदिप दंडवते यांच्यावर कलम 149 अन्वये कारवाई करण्यात आल्याचे विटा पोलिसांनी लेखी पत्र दिल्यानंतर हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याचे सरपंच जाधव यांनी सांगितले.

आळसंद गावामध्ये 2006-07 साली जलस्वराज योजनेमध्ये नियमबाह्यपणे काम करुन भ्रष्टाचार करणार्‍या हिम्मत बाजीराव जाधव व खंडेराव लक्ष्मण जाधव यांच्यावर कारवाई करण्यात यावी, तसेच गावातील राष्ट्रीय पेयजल योजनेच्या कामात अडथळे आणणे,पिण्याच्या पाण्याबाबत खोट्या अफवा पसरवणे व विनाकारक ग्रा.पं.च्या कारभारात हस्तक्षेप करुन वेठीस धरणे आदी गैरप्रकार करणार्‍या व्यक्तीवंरती कारवाई करावी अशी मागणी आळसंदच्या सरपंच व ग्रा.प. सदस्य व आजी माजी पदाधिकार्‍यांच्यावतीने जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा पोलिस प्रमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती. यानुसार याप्रकरणी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुड्डेवार यांनी जलस्वराज्य योजनेत भ्रष्टाचार करणार्‍यांवर कारवाई करण्यात येईल, असे दूरध्वनीवरुन बोलताना सरपंच इंदूमती जाधव व माजी उपसरंपच नितीनराजे जाधव यांना सांगितले.

तसेच आळसंद तलावाशेजारी ग्रा.पं.मालकीची पुर्वीची असलेल्या विहिरीवरती विद्युत मोटर बसवणे, जलशुध्दीकरण केंद्रापासून बॅक वाॅटर ड्रेनेजसाठी 15 व्या वित्त आयोग निधीतून टेंडर काढणे, तसेच जलशुद्धीकरण केंद्राची देखभाल दुरुस्ती करुन त्या जागेभोवती बंदिस्त तार कंपाउंड घालणे, ग्रामस्थांना वेळेत व नियमित पाणीपुरवठा कर्मचार्‍यांना कामाची रुपरेषा ठरवून देणे, ग्रा.पं.कर वसुलीसाठी कर्मचार्‍यांसोबत जाऊन ग्रामस्थांना भेटणे, कामामध्ये हयगय व कामचुकारपणा करणार्‍या कर्मचार्‍यांचे निलंबन करणे, आणि ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याबाबत काही तक्रारी असल्यास समक्ष जाऊन पाहणी करुन अहवाल सादर करणेसाठी कार्यवाही करण्याबाबतची लेखी सूचना सरपंच इंदूमती जाधव यांच्यावतीने ग्रामसेवक सपाटे व ग्रामविस्तार अधिकारी राजमाने यांना यानिमित्ताने करण्यात आली.

Post a Comment

0 Comments