Daily Mahasatta

Daily Mahasatta

केंद्र शासनाने सर्वसामान्यांच्या खिशालाच कात्री लावली : पृथ्वीराज पाटील

 सांगली, (प्रतिनिधी)
पेट्रोलवर अडीच रुपये आणि डिझेलवर चार रुपये अधिभार लादून केंद्र सरकारने सर्वसामान्य माणसांच्याच खिशाला कात्री लावली आहे, याची मोठी झळ त्यांना सोसावी लागणार आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांनी दिली आहे.

श्री. पाटील यांनी म्हंटले आहे की, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज यंदाचा अर्थसंकल्प सादर केला, परंतु त्यामध्ये गोरगरीब आणि सर्वसामान्य माणसाच्या हिताच्यादृष्टीने कुठलेही निर्णय घेतले नाहीत. कोरोना काळात या कमकुवत घटकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्यांच्या पदरात थेट काही गोष्टी पडतील याचा विचार या अर्थसंकल्पात करायला हवा होता. शिक्षणासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रातसुद्धा काही विशेष तरतूद झालेली नाही.

ते म्हणाले, पेट्रोल आणि डिझेलवर अधिभार लादून या दोन गोष्टी आणखी महाग केल्या आहेत. हे पैसे थेट केंद्राला मिळणार आहेत, राज्याला त्यातला एकही पैसा मिळणार नाही. आधीच पेट्रोल आणि डिझेल शंभरीकडे चालले आहे, त्याचे दर कमी करण्याऐवजी वाढवले आहेत. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्यावरही हा अधिभार पडणार आहे. शेतकरी शेतीसाठी सर्रास मशिनरी वापरत आहे, आणि त्यासाठी डिझेलची आवश्यकता भासते. म्हणजेच शेतकर्‍याला मदत करण्याऐवजी त्यांच्याच खिश्यातून पैसा जाणार आहे.

श्री. पाटील यांनी म्हटले आहे की, केंद्राने लादलेले शेतकऱ्यांबाबतचे तिन्ही काळे कायदे मागे घ्यावेत, यासाठी मोठे आंदोलन नवी दिल्लीत सुरू आहे, त्याचा काहीही विचार या अर्थसंकल्पात झालेला नाही. शेतीसाठी गेल्यावर्षीच्या तुलनेत कोणतीही मोठी आर्थिक तरतूद झालेली नाही.

ते म्हणाले, कोरोनामुळे अनेक उद्योग अडचणीत आले, अशा लघु, मध्यम आणि मोठ्या उद्योगांना केंद्राने मदत करायला हवी होती, त्याचीही तरतूद दिसत नाही. हा अर्थसंकल्प मुळात शेतकरी, सर्वसामान्य या लोकांसाठी नाहीच, तो कार्पोरेट जगताशी जोडणारा आणि त्यांना तारणारा अर्थसंकल्प आहे. महाराष्ट्रासाठीही विशेष तरतूद काहीच नाही. नाशिक, नागपूर मेट्रोसाठी केलेली तरतूद ही नियमित आहे. भाजपची सत्ता नसल्यामुळे महाराष्ट्राकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.

इलेक्शन डोळ्यासमोर ठेऊन त्यासाठी बजेट चा वापर केला जात आहे, जिथे निवडणूक तिथंच विकास असा वाईट पायंडा हे सरकार पाडत आहे. याशिवायची इतर सगळी आश्वासने ही फेक वाटतात. खरी एकच गोष्ट आहे ती म्हणजे पेट्रोल आणि डिझेल चा वाढता दर. सेंच्युरी मारल्याशिबाय राहायचं नाही असा निर्णय या सरकारने घेतला आहे, अस दिसतं.

--------

Post a Comment

0 Comments