Daily Mahasatta

Daily Mahasatta

सुहास बाबरानी टक्केवारीवर बोलणे हा सर्वात मोठा विनोद : अॅड. वैभव पाटील

विटा ( मनोज देवकर)
विटा शहरातील राजकीय वातावरण तापले असून आज शिवसेनेने केलेल्या आंदोलन आणि टिकेला विट्याचे माजी नगराध्यक्ष आणि सत्ताधारी गटाचे नेते वैभव पाटील यांनी प्रसिद्धी पत्रक काढून उत्तर दिले . सुहास बाबर यांनी टक्केवारीवर बेंबीच्या देठापासुन ओरडणे हा जगातला सर्वात मोठा विनोद आहे. ज्यांनी भ्रष्ट कारभाराने साखर कारखाना,सुत गिरणी,पतसंस्था,बॅंका संपवील्या ,ज्यांना गेल्या चाळीस वर्षाच्या राजकारणात एकही नवी संस्था सुरु करता आली नाही,रहात्या गार्डी गावचा पाण्याचा ,रस्त्याचा प्रश्न सोडवीता आला नाही ,ज्यांच्या गावची स्मशानभुमी मोडकळीस आली आहे त्यांनी विकासकामे व भ्रष्टाचारावर बोलणे हा "चोराच्या उलट्या बोंबा " असा प्रकार आहे असे पाटील यांनी म्हणले आहे.

सुहास बाबरांचे आंदोलन हे पावसाळी छत्र्यांसारखे असून त्यांचे विट्यावरील प्रेम हे पुतनामावशीचे असल्याची टिका पाटील यांनी केली आहे. मायणी रोड वरच्या पुलाचे रुंदीकरण व डांबरीकरणाचे विकास काम हे विटा नगरपरीषदेच्या वतीने रीतसर सुरु असुन रुंदीकरणानंतर रस्ता करण्यापुर्वी रस्त्याची लेवल एकसारखी करण्याकामी मुरुम भरावा करुन डांबरीकरण करण्यात येणार आहे .दरम्याण या परिसरातील चव्हाण परीवाराच्या इमारतीमधील बेसमेंट ला जमा होणारे पावसाळ्यातील पावसाचे पाणी बाहेर काढुन याच ओढापात्रात सोडण्यासाठी त्यांनी रीतसर अर्ज देऊन त्यांच्या इमारतीपासुन ओढ्यापर्यंत जेसीबीने खुदाई करुन चर काढली आणि पाईपलाईन केली. यामध्ये तयार झालेल्या खड्ड्यात एक ट्रक अडकण्याची दुर्दैवी घटना घडली.हा ट्रक काढुन रस्त्याचे व पुलाचे डांबरीकरण काम प्रगतीपथावर येणारच होते.

मात्र नेमक्या याच दुर्दैवी घटनेचा येऊ घातलेल्या नगरपरीषद निवडणुकीच्या तोंडावर राजकिय लाभ घेण्यासाठी सुहास बाबरांनी केवळ पावसाळ्यात उगवीणाऱ्या छत्रीप्रमाणे केविलवाणा वापर सुरु केला आहे. गेल्या चार वर्षात चकार शब्द न काढलेली आणि विटेकरांनी मागील अनेक निवडणुकांत भरघोस मतांनी नाकारलेली फौज घेऊन बाबरानी आंदोलनाचा फार्स केला . तो विटेकरांना नेहमीच परिचयाचा आहे. सुहास बाबरांना रस्त्याचा व विट्याचा एवढा पुळका असेल तर पहिला सांगली रोडवरच्या तीन ओढ्यावरच्या पुलाची देखभाल दुरुस्ती करावी, गुढघाभर पडलेले खड्डे मुजवावावेत.

माजी आमदार सदाशिव पाटील यांनी स्वमालकीची जागा विनामोबदला शासनास देऊन तालुका क्रिडा संकुल बांधले. त्याची दुरावस्थेबद्दल बोलावे व मग विटा नगरपरीषदेच्या कारभारावर बोलावे. सबब बाबरांच्या या सवंग प्रसिद्धीसाठी केलेल्या आंदोलनाची दखल घ्यायची आम्हास व विटेकरांनाही जरुर नाही. विटेकर सुज्ञ आहेत तरीही गैरसमज पसरु नयेत म्हणुन हा खुलासा प्रसारीत केला आहे. विटेकरांनी यामुळे विचलीत न होता आपणा सर्वांना आपले शहर स्वच्छता अभियानात प्रथम क्रमांकावर आणायचे आहे ,त्या प्रयत्नात आपण सर्वांनी सहभागी व्हावे अशी विनंती वैभव पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

Post a Comment

0 Comments