Daily Mahasatta

Daily Mahasatta

निराधार लोकांना गावातच सांभाळा : भास्कर पेरे पाटील

विटा ( मनोज देवकर )
ग्रामीण भागाचा विकास जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत देशाचा विकास होणार नाही. ग्रामस्वच्छता , जलसंधारण , शिक्षण , वृक्षारोपण यासोबत गावात ज्याला कुणी नाही त्यांना गावातच सांभाळा असे प्रतिपादन पाटोदा चे माजी सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी केले. वलखड गावात माऊली फौंडेशनच्यावतीने गेल्या वर्षभरात जन्मलेल्या मुलींच्या नावे पाच हजार रुपयांच्या ठेवी पोस्टात बचत ठेव म्हणून ठेवण्यात आल्या. त्या ठेवींच्या प्रमाणपत्रांचे वाटप पेरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी बोलताना पेरे पाटील यांनी पाटोदा गावी केलेल्या विकासकामांचे अनुभव सांगितले. अनाथाश्रम , वृद्धाश्रमात निराधार लोकांना समाधान वाटत नाही. त्यांची सोय गावातच आपल्या माणसात केल्याने ते आनंदाने राहतील अश्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. विविध प्रकारे पाण्याचा अपव्यय होतो. जास्तीतजास्त पाणी जमिनीत जिरवण्याचा प्रयत्न करा. झाडं हे पावसाचे एटीएम आहे. जास्तीत जास्त फळझाडे लावा असे आवाहन त्यांनी केले.

समाजाला योग्य शिकवण न मिळाल्याने तो चुकीच्या दिशेने गेल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. दहा वीस एकर जमीन असणारा शेतकरी आत्महत्त्या करत आहेत. याचा अर्थ फार मोठी गडबड आहे . आपल्या देशात काही गोष्टी का करायच्या हे कोणालाच माहीत नाही पण त्या गोष्टी समाज करतो.समाजाला योग्य गोष्टी करायला सांगणाऱ्या प्रबोधनकारांची गरज आहे असे प्रतिपादन भास्कर पेरे पाटील यांनी केले.

यावेळी तहसीलदार ऋषिकेश शेळके म्हणाले आपले गाव आदर्श होण्याच्या दृष्टीने पाटोदा गावचा आदर्श घेऊन वाटचाल करा . मुलगी वाचवा, मुलगी शिकवा हा माऊली फाउंडेशन चा स्तुत्य उपक्रम आहे. मुलीच्या जन्माचे स्वागत करणे स्पृहणीय आहे. कुऱ्हाड बंदी, नशा बंदी सारखे उपक्रम राबवण्यासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घ्यावा असे तहसीलदार म्हणाले.
यावेळी गटविकास अधिकारी संदीप पवार , डाक निरीक्षक ज्ञानेश कुलकर्णी उपस्थित होते. माऊली फौंडेशन चे राजाराम जगदाळे , वसंत जगदाळे , सचिन जगदाळे , सरपंच द्रोपदा वसंत जगदाळे , उपसरपंच दाजीराम नलवडे , वाघेश साळुंखे , सतीश पाटील , संतोष जगदाळे , उत्तम कांबळे आणि मोठ्या संख्येने महिला आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी माऊली फाउंडेशनच्या वतीने कोविड योद्धयांचा सत्कार करण्यात आला.

Post a Comment

0 Comments