Daily Mahasatta

Daily Mahasatta

अन्यथा... महापालिकेवर गुन्हा दाखल करणार: ॲड. अमित शिंदे

मिरज : बस स्टॅन्ड रोडवरील धोकादायक गटारीचा पंचनामा करताना अॅड अमित शिंदे

सांगली ( प्रतिनिधी)
मिरज बस स्टॅन्ड ते मिरज रेल्वे जंक्शन रोडवरील महापालिकेने अर्धवट अवस्थेत सोडलेल्या धोकादायक गटारीचा पंचनामा आज सांगली जिल्हा सुधार समितीतर्फे करण्यात आला. या गटारीच्या कामामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झालेला असून ती तात्काळ दुरुस्त न केल्यास सर्व नागरिकाना घेवून महापालिकेविरुद्ध भारतीय दंड विधान संहितेनुसार गुन्हा दाखल करेपर्यंत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा समितीचे अध्यक्ष ॲड. अमित शिंदे यांनी दिला आहे.

मिरज बस स्टड ते मिरज रेल्वे जंक्शन रोडवर महापालिकेने दुतर्फा गटार बांधण्याचे काम सुरु केले आहे. त्याचा पंचनामा सांगली जिल्हा सुधार समितीने केला. परंतु त्या कामाचा सुरवात व शेवट कोठे आहे तेच समजून येत नाही. रस्त्याच्या मध्यभागी दोन्ही बाजूला साधारण पन्नास मीटर चरी काढून ठेवलेल्या आहेत. एका बाजूला सिमेंट कॉंक्रीटची चर तयार केलेली आहे. त्या चरीच्या कामातून सळ्या बाहेर आलेल्या आहेत. या चरीमध्ये मैला मिश्रित पाणी साठून मोठे डबके तयार झालेले आहे. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून त्यांच्या जागेमध्ये जाणे येणे मुशिक्ल झाले आहे.

धोकादायक चरीमध्ये अनेकजण पडून जखमी झालेले आहेत. हा रस्ता रहदारीचा मुख्य रस्ता आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दवाखाने, हॉटेल, दुकाने, रहिवासी क्षेत्र त्याचबरोबर खाद्यपदार्थांचे हातगाडे आहेत. त्या सर्वाना या चरीमुळे जाण्या येण्यास धोका निर्माण झालेला आहे. तसेच मैला मिश्रित पाणी साचून राहिल्याने व ते पाणी बाहेर जाण्यासाठी कोणताच मार्ग नसल्याने या मैलामिश्रित पाण्याची दुर्गंधी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पसरली आहे. या मैलामिश्रित पाण्यामध्ये डास, अळ्या तयार होत असल्याने रागराई पसरत आहे. तसेच गटारी खोदताना पाण्याच्या पाईपलाईन तुटल्याने नागरिकांना पाणी देखील मिळणे अवघड झालेले आहे.

या पंचनाम्यावेळी स्थानिक नागरिकांनी उपस्थित राहून त्याना सोसाव्या लागणाऱ्या त्रासाबाबत सविस्तर कैफियत मांडली. याबाबत अमित शिंदे यांनी महापालिकेचे अभियंता तसेच उपमहापौर आनंदा देवमाने यांना संपर्क करून सर्व माहिती दिली व काम तात्काळ पूर्ण करण्याबाबत कळविले. हे काम लवकरात लवकर सुरु करावे, किंवा चरी मुजवून टाकाव्यात अन्यथा महापलिकेवर जीवितास धोका निर्माण केल्याबाबत गुन्हा दाखल करेपर्यंत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्त्यांनी दिला. त्याबाबत दोन दिवसात नागरिकांच्या सह्यांसहित रितसर तक्रार मिरज शहर पोलीस स्टेशनला देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी रोहित शिंदे, युवराज नायकवडे, नितीन मोरे, जयंत जाधव, महालिंग हेगडे, अल्ताफ पटेल, अरुणा शिंदे, नौशाद मुल्ला व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments