Daily Mahasatta

Daily Mahasatta

शिराळ्याच्या विकासासाठी मंत्री आदित्य ठाकरे - आ. मानसिंगराव नाईक यांची बैठक संपन्न

शिराळा ( राजेंद्र दिवाण)
शिराळ्यातील भुईकोट किल्ल्याचा विकास व संभाजीराजे यांचे स्मारक निश्चितच होणार आहे, अशी माहिती आमदार मानसिंगराव नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

आमदार नाईक म्हणाले, बुधवारी मुंबईमध्ये झालेल्या बैठकीत पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी आराखड्यास तत्त्वतः मान्यता दिली असून आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. येत्या मार्चमध्ये आराखडा तयार झाल्यानंतर त्यास रीतसर मान्यता मिळेल. मुंबईतील बैठकीत, पर्यटनमंत्री मार्चमध्ये चांदोली अभयारण्याचा दौरा करणार असे सांगितले. मार्चमध्ये रीतसर मान्यता मिळाल्यानंतर, शहरातील लोकांच्या श्रद्धेशी जोडला गेलेला प्रश्न म्हणजे भुईकोट किल्ला व संभाजी राजांचे अत्यंत सुंदर असे स्मारक हे दोन्ही प्रश्न नक्कीच मार्गे लागतील असे ते यावेळी म्हणाले.

त्याचप्रमाणे येत्या मार्च महिन्यात पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे व सांगली जिल्ह्याचे पालक मंत्री नामदार जयंत राव पाटील हे चांदोली अभयारण्य पर्यटन विकासाच्या दृष्टीने दौरा करणार आहेत आणि त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. मुंबईतील या बैठकीत भुईकोट किल्ल्याचा विकास, त्याच प्रमाणे संभाजीराजे यांचे स्मारक , चांदोली अभयारण्याचा पर्यटन दृष्टीने विकास अशा विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. संभाजी राजांना सोडवण्याचा एकमेव प्रयत्न फक्त शिराळ्यात झाला होता. संभाजीराजांच्या जीवनपटावर भित्तीशिल्प या ठिकाणी उभारण्यात येणार असून, संभाजीराजांचे स्वतंत्र अश्वारूढ पुतळ्याच्या रुपात स्मारकही उभारण्यात येणार आहे.

या ठिकाणी असलेला कोटेश्वर मंदिर, त्याचप्रमाणे तुळजाभवानीचे मंदिर याचाही विकास करण्याचे दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, असे असे आमदार मानसिंगराव नाईक या वेळी म्हणाले. या ठिकाणी भुईकोट किल्ल्याच्या परिसरात एकूण चार एकर जागा असून पैकी दोन एकर जागा सध्या उपलब्ध आहे या ठिकाणी ही जागा भरपूर व पुरेशी असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरू झालेले आहेत. या बैठकीत ते म्हणाले की शिराळा येथील रामदास स्वामी स्थापित मारुती मंदिर व येथील गोरक्षनाथ मंदिराच्या विकासाच्या दृष्टीनेही प्रयत्न निश्चित करण्यात आलेले आहेत. मुंबईतील या बैठकीस ना. अजितदादा पवार,ना. जयंतराव पाटील,पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, आमदार मानसिंगराव नाईक, खासदार धैर्यशील माने, शिराळा चे नगराध्यक्ष सौ सुनीताताई निकम, उपनगराध्यक्ष विजय दळवी, पर्यटन सचिव अधिकारीवर्ग उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments