Daily Mahasatta

Daily Mahasatta

मंदिरे, बिअर बार सुरु मग महाविद्यालय बंद का ? : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा सवाल

सांगली (प्रतिनिधी)
राज्यसरकारने बिअर - बार, हॉटेल, मंदिरे, व्यायामशाळा हे सर्व सुरू केले आहे, मग महाविद्यालयच बंद का ? असा सवाल करत लवकरचं महाविद्यालय सुरू व्हावीत, यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने सांगली येथील कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयाच्या समोर तीव्र आंदोलन करण्यात आले.

कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयाच्या प्राचार्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हंटल्यानुसार,
संपूर्ण राज्यामध्ये नाही तर देशामध्ये कोरोना मुळे गेल्या मार्च २०२० पासून सर्व महाविद्यालय बंद आहेत. पण हळू हळू परिस्थिती पूर्ववत होत आहे. आज महाविद्यालय बंद होऊन १० महिने उलटून गेली तरीही महाविद्यालय सुरू झालेली नाहीत, गेली १० महिने सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी घरात बसून आहेत. हे सरकार त्यांच्या भावनांशी खेळत आहे. खऱ्या अर्थाने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहे. आजची परिस्थिती पाहता कोरोनाचा प्रादूर्भाव हा खुप कमी झाला आहे. त्यामुळे तातडीने महाविद्यालय सुरु करण्यात यावीत.

शिक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं , शिक्षण मंत्री एक काम करो, खुर्ची छोडो आराम करो, अशा घोषणाबाजी ने महाविद्यालय परिसर दुमदुमुन गेला. या वेळी अभाविप च्या कार्यकर्त्यांनी आपले मते विद्यार्थी-विधार्थिनी समोर मांडले. येत्या काळात जर महाविद्यालय सुरू झाले नाहीत तर शिक्षण मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असे मत या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रतीक पाटील यांनी मांडले. महाविद्यालय बंद असल्या मुळे जे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्षाच नुकसान झालंय याला सरकार जबाबदार आहे, अशे मत माधुरी लड्डा यांनी व्यक्त केले. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या मागण्यांचे निवेदन ही प्राचार्यांना देण्यात आले.

Post a Comment

0 Comments