Daily Mahasatta

Daily Mahasatta

जयंत प्रीमियर कबड्डी स्पर्धेत नरसिंह टायगर्सने पटकावला विजेतेपदाचा चषक

इस्लामपूर : जयंत प्रीमियर कबड्डी लीच्या प्रथम विजेत्या नरसिंह टायगर्स या संघास बक्षीस वितरण करताना देवराजदादा पाटील, रणजित पाटील, खंडेराव जाधव (नाना), सौ. रुपाली जाधव व अन्य.

इस्लामपूर (सूर्यकांत शिंदे )
इस्लामपूर येथील जयंत प्रीमियर कबड्डी लीग स्पर्धेत नरसिंह टायगर्स (तांबवे) संघाने विजेतेपदाचा चषक पटकावला आहे. तसेच स्व. शरद लाहिगडे (एस. एल.) हरिकेन्स (कासेगाव) यांनी दुसरा, तर स्फूर्ती रॉयल्स (जुनेखेड) व लोकनेते राजारामबापू पाटील ईगल्स (कासेगाव) ने तिसरा क्रमांक पटकाविला आहे.

राज्याचे जल संपदा मंत्री ना. जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जयंत स्पोर्टसने आयोजित पाच दिवसांच्या लीगला कबड्डी प्रेमींचा अलोट प्रतिसाद लाभला. उदय जगताप (नरसिंह) अष्टपैलू खेळाडू, विशाल चिबडे (नरसिंह) उत्कृष्ठ चढाईपटू, तर आकाश शिवशरण (एस. एल.) उत्कृष्ठ बचावपटूचे मानकरी ठरले आहेत. सांगली जिल्हा मध्य. बँकेचे अध्यक्ष दिलीप तात्या पाटील यांनी स्पर्धेस भेट देत खेळाडूंचे कौतुक केले.

नरसिंह टायगर्स विरुद्ध एस. एल. हरिकेन्स यांच्यातील चुरशीच्या अंतिम सामन्यात नरसिंह प्रथम ६ गुणांनी पिछाडीवर होता. मात्र उदय जगताप,व विशाल चिबडे यांच्या अष्टपैलू खेळाने ही पिछाडी भरून काढत ५ गुणांनी एस. एल. वर मात केली. विशेष म्हणजे एस. एल. हरिकेन्सने नरसिंहला ५ गुणांनी नमवूनच अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. यानंतर नरसिंहने स्फूर्ती रॉयल्स वर विजय मिळून अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. तत्पूर्वी राजारामबापू ईगल्स विरुद्ध स्फूर्ती रॉयल्स या दोन संघातील उपांत्यपूर्व फेरीतील सामना अतिशय रोमहर्षक झाला. स्फूर्ती रॉयल्सने केवळ एक गुणाने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

विजेत्या संघांना जि. प. चे माजी अध्यक्ष देवराजदादा पाटील, माजी उपाध्यक्ष रणजित पाटील, मुख्य संयोजक नगरसेवक खंडेराव जाधव, सातारा डिस्ट्रिक्ट वुमेन्स एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा सौ. रुपाली जाधव यांच्या हस्ते रोख रक्कम,व शिल्ड वितरण करण्यात आले. यावेळी प्रकाश जाधव (दादा),अरुण कांबळे, आयुब हवालदार,अतुल लाहिगडे, ज्ञानदेव देसाई,हमीद लांडगे,ब्रह्मनंद पाटील,सागर पाटील,नितीन कोळगे, विनायक पाटील, मनीषा बाणेकर उपस्थित होते.
यावेळी आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू नितीन मदने, कासेगावचे राष्ट्रीय कबड्डीपटू बापू आडके, कुमार वगरे, इस्लामपूरचे युनूस शेख, जुनेखेडचे सूर्यकांत निकम, तसेच राष्ट्रीय बॉक्सर प्रीती बाणेकर यांचा गौरव करण्यात आला. राष्ट्रीय प्रशिक्षक नामदेव गावडे, राष्ट्रीय पंच कुबेर पाटील, प्रा. संदीप लवटे, अभय फडतरे यांनी हजेरी लावली.

सांगलीचे आलम मुजावर, प्रशांत कोरे, विकास पाटील, झाकीर इनामदार, गणेश भस्मे, निलेश देसाई, कामेरीचे रणजित इनामदार, जयराज पाटील, शिराळ्याचे सुशिलकुमार गायकवाड, वाळव्याचे सागर हेळवी, तुषार धनवडे, ऐतवडे खुर्दचे धनाजी सिद्ध यांनी पंच म्हणून जबाबदारी पार पाडली.

सागर जाधव, उमेश रासनकर, विजय (सोन्या देसाई), सदानंद पाटील, सचिन कोळी, अंकुश जाधव, शिवाजी पाटील, राजवर्धन लाड, अजय थोरात यांच्यासह जयंत स्पोर्ट्सच्या कार्यकर्त्यांनी स्पर्धेचे उत्कृष्ठ नियोजन केले. किशोर गावडे (मुंबई),प्रसाद कुलकर्णी (राजारामनगर) यांनी आपल्या प्रभावी वाणीने लीगमध्ये रंगत आणली.
------------------------------------------
आता लक्ष्य महा कबड्डी !!
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही लीग होताना,तालुक्यातील खेळाडूंनी उत्तुंग खेळ केला,त्यास कबड्डी प्रेमींनी उदंड प्रतिसाद देत लीग यशस्वी केली आहे. आता तालुक्यातील, जिल्ह्यातील खेळाडूंना संधी देण्यासाठी महा कबड्डी,तसेच युवा नेते प्रतिकदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली व्हॉलीबॉल लीग घेवू, अशी घोषणा मुख्य संयोजक खंडेराव जाधव (नाना) यांनी बक्षीस वितरणप्रसंगी केली. प्रथम विजेत्या नरसिंह टायगर्सचे मालक माजी जि.प. उपाध्यक्ष लिंबाजी पाटील, कृष्णेचे माजी संचालक ब्रह्मनंद पाटील यांनी बक्षिसाची रुपये २५ हजार ही रक्कम खेळाडूंना बक्षीस दिली.

Post a Comment

0 Comments