Daily Mahasatta

Daily Mahasatta

कॉम्रेड शिवाजीराव दौंडे ; स्व. टी. डी. लाड ही ध्येयवेडी माणसं होती : प्रा.बाबुराव गुरव

पलूस (प्रतिनिधी)
क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतिवीर नागनाथ नायकयवडी ,क्रांती अग्रणी डॉ.जी डी बापू लाड यांच्या सोबत सातत्याने अनेक कार्यात रस्त्यावरच्या लढाईत सहभागी होऊन समाज परिवर्तनासाठी आयुष्य वेचणारी कॉम्रेड शिवाजीराव दौंडे व शिक्षक नेते टी.डी.लाड ही माणसं म्हणजे कुंडलच्या क्रांतिभूमीतील तत्वनिष्ठ व ध्येयवेडी माणसं होती.असे प्रतिपादन ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत प्रा.डॉ बाबुराव गुरव यांनी कुंडल येथे केले.

रणसंग्राम सोशल फाउंडेशन च्या पुढाकाराने कुंडल येथे आयोजित केलेल्या विश्रामबाग शिक्षण संस्थेचे कार्यवाह व शिक्षक नेते स्वर्गीय टी.डी.लाड आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड शिवाजीराव दौंडे यांच्या श्रद्धांजलीपर शोकसभेत प्रा. डॉ. बाबुराव गुरव बोलत होते.

यावेळी सभा मंचावर प्रगतिशील लेखक संघाचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड मारुती शिरतोडे ,श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हाध्यक्ष अँड. कृष्णा पाटील, रणसंग्राम सोशल फाउंडेशनचे प्रमुख अँड. दीपक लाड ,किसान सभेचे नेते कॉम्रेड सुभाष पवार ,कामगार नेते पोपटराव सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रा. डाॅ. गुरव म्हणाले की एक विशिष्ट ध्येय घेऊन आयुष्य वेचणारी ही माणसं व यांचे कार्य समाजाच्या डोळ्यात भरण्यासारखे आहे.सरांनी शिक्षण व शिक्षकांच्या भल्यासाठी सतत संघर्ष केला तर कॉम्रेड शिवाजीराव दौंडे यांनी कम्युनिस्ट विचार हाच शेतकरी कामगार कष्टकऱ्यांसाठी परिवर्तनाचा विचार आहे असं मानून आयुष्यभर लालबावटा खांद्यावर घेतला. ही माणसं म्हणजे डाव्या पुरोगामी चळवळीतील एक अग्रगण्य व्यक्तिमत्व होती. या दोन महान माणसांनी दिलेला विचार जोपासून चांगल्या माणसांची एक फळी निर्माण करणं आणि गरिबातल्या गरीब माणसांमध्ये जग बदलाची आस निर्माण करणे हीच खरी या दोन महान व्यक्तींना आदरांजली ठरेल.

या शोकसभेत श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हाध्यक्ष अँड. कृष्णा पाटील ,आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडचे राज्य सरचिटणीस हिम्मतराव मलमे ,नाट्य चित्रपट दिग्दर्शक विक्रम शिरतोडे, किसान सभेचे नेते कॉम्रेड सुभाष पवार,समाज सेवा पतसंस्थेचे निवास सावत आदींनी श्रद्धांजलीपर आपले मनोगत व्यक्त केले.
या शोकसभेला प्रकाश लाड ,पोपटराव सूर्यवंशी, महादेव मासाळ, संदीप माळी ,संपत आवटे, बाबुराव शिंदे, प्रा.संदेश दौंडे , बाळासाहेब खेडकर ,आदित्य माळी, लक्ष्मण शिंदे यांचेसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. सभेत कॉम्रेड शिवाजीराव दौंडे यांच्या कार्यास उजाळा देऊन त्यांना विनम्र अभिवादन करून श्रद्धांजली वाहण्यात आली.या सभेचे सूत्रसंचालन शिवाजीराव रावळ यांनी केले तर आभार दिलीप शिंदे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments