Daily Mahasatta

Daily Mahasatta

चिरतरुण : शिवाजीभाऊ सावंत

विटा / विशेष लेख
प्रत्येक गावात काही वडीलधारी मंडळी असतात. गावातील सामाजिक सलोखा राखणे, वडीलकीच्या नात्याने एखाद्या विषयात मत मांडणे, सूचना करणे यासाठी त्यांच्याकडे आदराने पाहिले जाते. आमच्या लेंगरे गावातील शिवाजीभाऊ सावंत असेच वडीलधारी व्यक्तिमत्त्व. वयाने ज्येष्ठ असले तरी भाऊ मनाने चिरतरुण होते. युवकांच्यात युवक, तरुणांच्यात तरुण आणि ज्येष्ठाना मनाने तरुण बनिवणारे हे व्यक्तिमत्त्व होते.

साधारण वीस वर्षांपूर्वी भाऊ मुंबईतील नोकरीतून सेवानिवृत्त झाले आणि गावी लेंगरे येथे आले. सेवानिवृत्त झाल्यानंतर आयुष्य कसे जगावे? याचे चांगले उदाहरण भाऊंनी दिले. लहान मुलात लहान, तरुणांत तरुण आणि ज्येष्ठाना मनाने चिरतरुण करणारे त्यांचे व्यक्तिमत्व होते. कुस्तीची त्यांना खूप आवड होती. परिसरातच नव्हे तर अगदी कोल्हापूर, वारणेच्या मैदानापर्यंत ते कुस्ती पाहण्यासाठी जात. लेंगरेचे कुस्ती मैदान मोठे व्हावे, असे त्यांना मनोमन वाटत होते.

सेवानिवृत्तीनंतर त्यांनी लेंगरेत ज्येष्ठ नागरिकांचा अघोषित संघ तयार केला होता. भाऊंचे विनोदाचे टायमिंग जबरदस्त होते. जीवन हसत, खेळत जगणारे भाऊ अनेक विषयांवर अभ्यासपूर्ण मत मांडत होते. दहा वर्षांपूर्वी त्यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. जे योग्य ते योग्य आणि अयोग्य ते अयोग्यच म्हणणारे भाऊ आकस्मिक जातील असे वाटले नव्हते. आमच्या मळ्याच्या वाटेवर असणाऱ्या महाजनकीतील सावंत घराण्याशी जुना स्नेह असल्याचे आजोबा सांगत. शिवाजीभाऊंच्या जाण्याची बातमी धक्कादायक होती. तीन पिढ्यांशी त्यांच्याच पातळीवर संवाद साधणारे व्यक्तिमत्त्व हरपले. त्यांच्या आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली. या दुःखातून सावरण्यासाठी सावंत कुटुंबियांना ईश्वर बळ देवो, ही प्रार्थना.

सचिन भादुले,लेंगरे
( ता. खानापूर, जि. सांगली)

Post a Comment

0 Comments