Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली महापौर निवड ; अखेर काँग्रेसचे ठरलं...

वरिष्ठ पातळीवर चर्चा करून महापौर
पदाचा उमेदवार निश्चित करणार : पृथ्वीराज पाटील


सांगली, ( प्रतिनिधी)
राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर वरिष्ठ पातळीवर चर्चा करून सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक लढवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांनी आज येथे जाहीर केले.

महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक २३ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नगरसेवकांची मते जाणून घेण्यासाठी आज काँग्रेस भवनमध्ये बैठक घेण्यात आली. बैठकीत पृथ्वीराज पाटील, श्रीमती जयश्रीताई पाटील आणि विशाल पाटील यांनी नगरसेवकांशी स्वतंत्रपणे चर्चा करून मते जाणून घेतली.

या बैठकीनंतर पृथ्वीराज पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, महानगरपालिकेत गेली अडीच वर्षे भाजपची सत्ता आहे. मात्र त्यांचा कारभार पाहता शहरातील जनता त्यांना कंटाळली आहे. प्रशासन सत्ताधाऱ्यांचे ऐकत नाही. भाजपमध्ये अंतर्गत कलह चालू असून, दोन गट पडले आहेत. त्यामुळे ते विकास करू शकत नाहीत.

श्री. पाटील म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे, त्यामुळे आम्ही विकास निधी खेचून आणू शकतो आणि तिन्ही शहरांचा समतोल विकास करू शकतो, याबाबत आम्हाला विश्वास वाटतो. महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक कॉंग्रेस पक्षाने लढवावी, यासाठी सर्वच नगरसेवकांनी अनुकूलता दर्शविली आहे. बैठकीत प्रत्येक नगरसेवकांशी स्वतंत्रपणे चर्चा करण्यात आली. त्यासाठी कोण इच्छुक आहेत, याचीही चाचपणी करण्यात आली, असे त्यांनी सांगितले.ही निवडणूक लढवण्यासाठी उद्या सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल. त्या बैठकीत निर्णय झाल्यानंतर १८ तारखेला महाआघाडीच्या उमेदवारांची घोषणा होईल, असेही त्यांनी सांगितले.

बैठकीला महापालिकेतील विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, वहिदा नायकवडी, संतोष पाटील, फिरोज पठाण, मंगेश चव्हाण, अभिजीत भोसले यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.
------

Post a Comment

0 Comments