Daily Mahasatta

Daily Mahasatta

महात्मा फुले जन आरोग्य योजनेत भारती हॉस्पिटल जिल्ह्यात प्रथम, तर राज्यात तिसरे

सांगली : येथे पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते प्रमाणपत्र स्वीकारताना डॉ. डी. जी. मोटे, स्नेहल सागरे, विजया देवकुळे. शेजारी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी.

सांगली /प्रतिनिधी
महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेत येथील भारती मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल महाराष्ट्र राज्यात नंबर तीनवर असून सांगली जिल्ह्यात रुग्णांची सेवा करण्यात भारती हॉस्पिटलने प्रथम दर्जाचे स्थान पटकावले आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यामध्येही महाराष्ट्रात पहिल्या दहामध्ये भारती हॉस्पिटलचा समावेश झाल्याची माहिती भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ. एच. एम. कदम यांनी दिली. यावेळी अधिष्ठाता डॉ. शहाजी देशमुख उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी. जी. मोटे, जन आरोग्य योजनेच्या मेडिकल को ऑर्डिनटर डॉ. विजया देवकुळे, डॉ. स्नेहल सागरे व सहकार्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी प्रमुख उपस्थित होते.

ही योजना येथे २०१३ पासून कार्यरत असून २७ हजार २७१ गरीब रुग्णांनी आजपर्यंत या योजनेचा लाभ घेतला आहे. विशेष करून कोरोनाच्या साथीमध्ये तब्बल ११०० रुग्णांना भारती हॉस्पिटलने या योजनेचा लाभ दिल्याची माहिती डॉ. विजया देवकुळे यांनी दिली. जिल्ह्यात सर्वात जास्त रुग्णांचे उपचार या योजनेतून करण्यात आले आहेत. यावेळी सुनील मंडले, समाधान खांडकर व सहकारी उपस्थित होते.

किडनी ट्रान्सप्लांट, हार्ट बायपास, मेंदूच्या शस्त्रक्रिया, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, किडनी यांसारख्या मोठ्या सर्जरींचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे. येथे कोविड तसेच अन्य आजारांवर उपचार करण्यात येतात. अत्याधुनिक साधने उपलब्ध असून महाराष्ट्र शासनाच्या सर्व योजना येथे कार्यान्वित आहेत.
दरम्यान सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी भारती हॉस्पिटलमधील सर्व स्टाफचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments