Daily Mahasatta

Daily Mahasatta

नातवासाठी मासे पकडायला गेलेल्या पती- पत्नीचा बुडून मृत्यू

भाटशिरगाव : काटेरी फांजरच्या ( चिलारी) च्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढताना ग्रामस्थ.

शिराळा,(राजेंद्र दिवाण )
भाटशिरगाव (ता. शिराळा) येथील अर्जुन लक्ष्मण देसाई ( वय ५३) व सौ. सुमन अर्जुन देसाई (४६) या पती पत्नीचा नातवासाठी मासे पकडायला गेले असता पाझर तलावात बुडून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत चुलत भाऊ सुभाष राजाराम देसाई यांनी शिराळा पोलिसात वर्दी दिली. घटनास्थळ व पोलिसातून समजलेली माहिती अशी, भाटशिरगाव गावा जवळ शिराळा-सागाव या मुख्य रस्त्यालगत पाझर तलाव आहे. त्या ठिकाणी अर्जुन देसाई यांची वस्ती व शेती आहे. मुलगा दीपक हा ट्रॅक्टरवर चालक म्हणून कामाला असल्याने चिखली येथे होता. अर्जुन यांनी दुपारी मक्याला पाणी लावले होते. त्यावेळी लाईट गेल्याने व नातू मासे मागत असल्याने सुन धनश्रीला शेतात ठेवून अर्जुन आपल्या पत्नी व नातवासह तलावात मासेमारी करण्यासाठी गेले होते. सुमन एका काठावर तर अर्जुन दुसऱ्या काठावर बसले होते.

दरम्यान सुमन यांचा तोल गेल्याने त्या तलावात पडल्या. त्यांना वाचवण्यासाठी अर्जुन पोहत त्यांच्याकडे गेले असता सुमन यांनी त्यांना मिठी मारल्याने दोघांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना तलाव जवळ खेळत असणाऱ्या पाच वर्षांच्या नातू साकेत याने पहिली. तिथून पळत जाऊन आईला आजी आजोबा पाण्यात बुडल्याचे सांगितले. त्यानंतर नातेवाईकांना माहिती दिली. नातेवाईकांसह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. सहायक पोलिस निरीक्षक विशाल पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी तालावाच्या काठावर मोबाईल, व सुमन यांचे चप्पल आढळून आले. अर्जुन यांचा बटवा पाण्यात तरंगत होता. दुपारी कांदे येथील गोसावी समाज्याच्या लोकांनी पाण्यात मृतदेहाचा शोध घेतला पण आढळून आले नाहीत.

शेवटी चिलारी व दगड याच्या साह्याने रणजित देसाई, पिंटू अस्वले, शहाजी देसाई, सर्जेराव घोलप यांनी एकमेकांना मिठी मारलेले मृतदेह बाहेर काढले. त्यावेळी नातेवाईकांना केलेला आक्रोश हृदय पिटाळून टाकणारा होता. शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चयात मुलगा, विवाहित मुलगी ,सून, नातवंडे असा परिवार आहे. पुढील तपास पोलीस हवालदार एस. एस. नलवडे करीत आहे
------

Post a Comment

0 Comments