Daily Mahasatta

Daily Mahasatta

विटा पालिका भ्रष्टाचारात देशात अव्वल : सुहास बाबर यांची टीका

विटा : शिवसेनेचे युवा नेते सुहास बाबर यांच्या नेतृत्वाखाली विटा पालिकेच्या भ्रष्ट कारभाराविरोधात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

विटा ( मनोज देवकर )
राष्ट्रीय महामार्गावर माती टाकणे योग्य नाही. विट्यातील रस्त्यांसाठी आमदार अनिल बाबर यांनी बारा कोटींचा निधी मंजूर करून आणला आहे. भाऊंनी एवढा निधी आणून ही रस्त्यांची अवस्था वाईट असेल तर एवढी भ्रष्टाचारी नगरपालिका देशात दुसरी नसेल. आमदारांनी आणलेल्या निधीचे श्रेय त्यांना मिळू नये म्हणून तुम्ही निधी नाकारत आहात आणि सदर निधीतून सुचवलेली कामे निकृष्ट पद्धतीने करत असल्याचा घणाघात, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी केला. विटा मायणी रस्त्यावर ओढ्यानजीक रस्त्यावर बसून रास्तारोको आंदोलनकरण्यात आले.

विटा मायणी रस्त्यावरील ओढ्याजवळ मुख्य मार्गावर ट्रकची चाके रुचली होती. त्यानंतर पालिकेचा पाण्याचा टँकर देखील याच रस्त्यावर चाके रुतल्याने अडकून पडला होता. याबाबत दोन्ही पक्षाकडून आरोप प्रत्यारोप सुरु होते. आज शिवसेनेचे युवा नेते सुहास बाबर यांच्या नेतृत्वाखाली पालिकेच्या भ्रष्ट कारभाराविरोधात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

वारंवार निवेदन देऊन ही रस्त्याचे काम निकृष्ट पद्धतीने करण्यात येत आहेत. नाइलाजास्तव आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागत आहे. जर नगरपालिकेच्या परवानगी शिवाय कुणी राष्ट्रीय महामार्ग उकरत असेल तर त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल का केला नाही अशी प्रश्नांची सरबत्ती बाबर यांनी आंदोलकांना भेटायला आलेल्या विट्याच्या मुख्याधिकारी अतुल पाटील यांच्यावर केली.

गेली पाच सात वर्षे केवळ मुरूम टाकणे आणि वरवरचे डांबरीकरण करण्याचे काम सुरू आहे. चिरवळ ओढ्यात निघालेला गाळ तुम्ही रस्त्यात भरला आहे. जनतेचे पैसे वाया घालवत आहात. हे पैसे तुमच्या घरात जात आहेत असा आरोप सुहास बाबर यांनी सत्ताधाऱ्यांवर केला.

निकृष्ट दर्जाच्या रस्ते बांधकामाविरोधात आज विट्यात शिवसैनिकांनी रास्तारोको आंदोलन केले. मायणी रस्त्यावरील ओढ्यानजीक माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिवसैनिकांनी रस्त्यावर बसून आंदोलन केले. यावेळी टक्केवारी खाणाऱ्या नगरपालिकेचा धिक्कार असो अश्या घोषणा स्वतः बाबर यांनी दिल्या.

भ्रष्टाचाराने बरबटलेल्या नगरपालिकेचा धिक्कार असो , जनतेच्या पैशाची उधळपट्टी करणाऱ्या नगरपालिकेचा धिक्कार असो , जनतेचे पैसे खड्डयात घालणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा माज उतरलाच पाहिजे , सामान्य जनतेस वेठीस धरणाऱ्या नगरपालिकेचा धिक्कार असो अश्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी नगरसेवक अमर शितोळे , समीर कदम , संजय भिंगारदेवे , राजू जाधव , ऍड. विनोद गोसावी , विजय जाधव , भारत पवार , विजय सपकाळ, सीताराम बुचडे , रामचंद्र भिंगारदेवे , अस्लम मुल्ला , माधवराव कदम , मिलिंद लकडे, अविनाश चोथे , मिलिंद कदम , रणजित पाटील आणि शिवसैनिक उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments