Daily Mahasatta

Daily Mahasatta

इस्लामपूरातील खून प्रकरणी गुन्हा दाखल ; आरोपी अद्याप फरार

इस्लामपूर ता.( प्रतिनिधी )
शेताला पाजलेले पाणी रस्त्यावर आल्याने काल झालेल्या वादातून आज सकाळी अशोक आनंदा पाटील (रा. साखराळे, जि. सांगली) यांच्या डोक्यात लोखंडी गज घालून त्यांचा खून केल्याची घटना इस्लामपूर-नवेखेड रस्त्यावरील शेतात सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली. संशयित प्रशांत बाबुराव पाटील घटनेनंतर फरार झाला आहे. खुनाची नोंद इस्लामपूर पोलिस ठाण्यात झाली असून पोलिसांनी प्रशांत पाटील याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद केला आहे.

याबाबत अजित रामचंद्र पाटील यांनी फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे अजित पाटील आणि त्या परिसरातील १७ शेतकर्‍यांची पाण्याची स्कीम केली आहे. या स्कीम मध्ये भागीदार असलेले अशोक पाटील हेच पाटकरी म्हणून काम करतात. रविवारी दुपारी बाराच्या सुमारास अशोक पाटील आणि मी आमच्या शेतात बोलत थांबलो असता त्या परिसरातील शेतकरी बाबुराव भगवान पाटील यांनी अशोक पाटील यांना तू नीट पाणी पाजत जा. मुद्दामहून वाटेवर पाणी सोडतोस असे म्हणून भांडण काढून शिवीगाळ केली होती.

दरम्यान आज सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास बाबुराव पाटील यांचा मुलगा प्रशांत पाटील याने काल वडिलांच्या सोबत झालेल्या वादाचा राग मनात धरून अशोक पाटील यांना शेतात पाणी पाजत असताना मारहाण करायला सुरुवात केली. हातातील लोखंडी गजाने त्याने त्यांना मारहाण केली. लोखंडी गजाचा प्रहार डोक्यावर वर्मी लागल्याने अशोक पाटील हे जागीच ठार झाले. ते ठार झाल्याचे लक्षात येताच प्रशांत पाटील यांने तिथून पलायन केले.

पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. उत्तरीय तपासणी नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पोलिस निरीक्षक नारायण देशमुख 
अधिक तपास करत आहेत. 

Post a Comment

0 Comments