Daily Mahasatta

Daily Mahasatta

पडळकर, होळकरांनी राजकीय स्वार्थासाठी लाजलज्जा सोडली : विक्रम ढोणे


सांगली (प्रतिनिधी)
जेजुरीच्या खंडोबा गडावरील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या ठिकाणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी घातलेला धुडगूस आणि त्यानंतर भाजप नेते भुषणसिंह होळकर यांनी घेतलेली भुमिका हा भाजपने रचलेल्या षढयंत्राचा भाग आहे. पडळकर आणि होळकर यांचे धनगर समाजाच्या चळवळीसाठी काडीचेही योगदान नाही, मात्र धनगर समाजाचे आयते नेतृत्व मिळावे म्हणून दोघांनीही लाजलज्जा सोडली आहे, अशी टीका धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केली आहे.

धनगर वोटबँकेसाठी सुरू असलेल्या राजकारणाची वस्तुस्थिती मांडणारी चळवळ या अभियानाच्या माध्यमातून करत असल्याचे नमूद करून ढोणे यांनी म्हटले आहे की, जेजुरी येथील पुतळा अनावरणाचा समारंभ हा महाराष्ट्रासाठी गौरवाचा क्षण होता. जेजुरी आणि होळकर घराणे हे अतूट नाते आहे. अहिल्यादेवींनी जेजुरीच्या विकासात अनमोल असे योगदान दिलेले आहे. त्यामुळे गडावर अहिल्यादेवींचा पुतळा उभारावा अशी मागणी 3 वर्षांपुर्वी काही होळकरप्रेमींनी देवदेवस्थान ट्रस्टकडे केली होती.

गेल्या काही वर्षात पुतळा उभारणीसंदर्भात ठोस पावले उचलली गेली. अतिशय सुंदरा पुतळा उभारला गेला. त्याचे अनावरण शनिवारी (ता. 13) समारंभपुर्वक झाले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबरोबरच होळकर राजघराण्याचे युवराज यशवंतराव होळकर व करवीर घराण्याचे युवराज संभाजीराजे छत्रपती यांना निमंत्रित करण्यात आले होते. पण तत्पुर्वीच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुतळास्थळी येवून हुल्लडबाजी केली. शरद पवार यांच्याहस्ते अनावरणाला विरोध असल्याचे सांगत पुतळ्याच्या ठिकाणी हाणामारी केली. कार्यकर्त्यांना पुतळ्याच्या तिथे वर चढवून ओढाओढी केली. हा प्रकार पुतळ्याची विटंबना करण्याचा होता. त्यांनी नियोजनबद्धरित्या पुतळा अनावरण समारंभाला गालबोट लावले. पुतळ्याचे अनावरण कुणाच्या हस्ते घ्यावे, कधी घ्यावे हा ट्रस्टचा विषय असताना पडळकरांनी भाजपच्या इशाऱ्यावरून काळीमा लावणारे कृत्य केले आहे. या प्रकाराला भाजप नेते आणि स्वत:ला होळकरांचे वंशज म्हणवून घेणारे भूषणसिंह होळकर यांची साथ होती, हे आता महाराष्ट्राला समजले आहे.

पडळकर आणि होळकर हे भाजपमध्ये धनगर समाजाच्या नावावर पदे मिळवण्यासाठी धडपडत आहेत. होळकर हे काही दिवसांपुर्वी भाजपच्या ओबीसी सेलचे उपाध्यक्ष झाले होते. तसेच भाजपच्या उमेदवारांसठी मते मागत होते. जेजुरी येथील प्रकाराच्या निमित्ताने त्यांनीही राजकीय डाव साधला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपुर्वीच शरद पवारांवरील टिकेच्या धोरणाबाबत स्पष्टीकरण दिलेले आहे. भाजप पक्ष वाढावा म्हणून आम्ही पवारांवर ठरवून टीका करतो, असे जाहीरपणे सांगितले आहे. त्यानुसार पडळकर हे सातत्याने पवारांवर अत्यंत वादग्रस्त टीका करत असतात. टिकेतून वाद झाल्यावर मग भाजपचे समर्थक घेवून समर्थनार्थ आंदोलने केली जातात, शिवाय ती आंदोलने धनगर समाजातून होत असल्याचे ढोंग रचले जाते. या षढयंत्राचा पुढचा अंक जेजुरीत केला गेला. शरद पवार भ्रष्टाचारी आहेत असे म्हणून त्यांच्याहस्ते उद्घाटन नको अशी भुमिका घेत पडळकरांनी अंधारात येवून स्टंटबाजी केली. या भुमिकेचे समर्थन करण्याची ताकद भाजपमध्ये आहे काय? याचे उत्तर संस्कृतीच्या गप्पा मारणारा कोणता भाजप नेता देवू शकेल, असा प्रश्न ढोणे यांनी विचारला आहे.

महत्वाची बाब ही की, पडळकरांचे अहिल्यादेवींच्या कार्याबद्दल अथवा धनगर समाजाच्या सामाजिक चळवळीबद्दल कर्तृत्व तरी काय? हुल्लडबाजी करून स्वतःचे महत्व वाढवणे एवढाच त्यांचा हेतू आहे. पडळकरांनी यापुर्वी चौंडी (ता. जामखेड) व सोलापूर विद्यापीठाच्या कार्यक्रमात गोंधळ घातला आहे. महत्व दिले नाही तर गोंधळ घालायचा, ही त्यांची पद्धत आहे. जेजुरीच्या कार्यक्रमात महत्व मिळाले नाहीच, शिवाय चंद्रकांत पाटील यांच्या इशाऱ्यावरून भाजपच्या वोटबँक पॉलिटिक्सचा भाग म्हणून हुल्लडबाजीचे अघोरी कृत्य त्यांनी केले आहे.  चंद्रकांत पाटील यांच्या प्रेमासाठी त्यांनी अहिल्यादेवींच्या नावाने होणाऱ्या कार्यक्रमाची विटंबना केली आहे. देवस्थानच्या ठिकाणी वाद करणे हाही पडळकरांच्या सवयीचा विषय आहे. आरेवाडीतील बिरोबा बनात स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी राजकीय अड्डा सुरू केला. सुरूवातीला नाव समाजाचे घेतेले, नंतर दोनच वर्षांत खरे रूप दाखवून स्वतःचा राजकीय एजेंडा राबवला. समाजाचे नाव वापरायचे आणि स्वार्थ साधण्याची वेळी आली की समाजाला फेकून द्यायचे ही पडळकरांची वृत्ती आहे. आरेवाडीत जो तमाशा केला तोच प्रकार जेजुरीत केला गेला.

जेजुरीत पडळकरांनी जी हुल्लडबाजी केली ते ठिकाण महाराष्ट्राच्या अस्मितेचे आणि सामाजिक एकतेचे प्रतिक आहे. त्याठिकाणी शिवाजीराजे आणि शहाजीराजे यांच्या भेटीचे शिल्प आहे, तसेच आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक यांचा पुतळा आहे. अशा ठिकाणी पडळकरांनी हुल्लडबाजी करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. बहुजन समाजातील जातीजातींत भांडण लावण्याचे षढयंत्र या पाठीमागे आहे. पडळकरांची तोंडची भाषा आणि प्रत्यक्ष कृती वेगवेगळी आहे.

भाजप नेते भूषणसिंह होळकर हे गेल्या चार वर्षांपासून सक्रिय आहेत. धनगर समाजाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावत आहेत. ते स्वतः होळकरांचे वंशज असल्याचे सांगतात. समाजानेही त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांचा मानसन्मान केला. मात्र महिनाभरापुर्वी होळकरांचे खरे वारस, महेश्वरचे राजे यशवंतराव होळकर हे जेजुरीला कुलाचाराला आल्यापासून भुषणसिंह यांचे खरे रूप बाहेर पडले आहे. यशवंतराव होळकर हे जेजुरीला आल्यानंतर लगेचच यशवंतराव यांची बदनामी करणारी पोस्ट सोशल मिडीयात फिरवली गेली. यशवंतराव हे परदेशी महिलेचे पुत्र आहेत, ते कायद्याने वारस नाहीत, असे त्यातून सांगण्याचा प्रयत्न झाला. खरे वारस महाराष्ट्रात आल्यामुळे भूषणसिंह अस्वस्थ झाले आणि त्यांनीही जेजुरीतील अहिल्यादेवींच्या कार्यक्रमाला गालबोट लावण्याचे पातक केले. भुषणसिंह यांना न बोलवता, खरे वारस यशवंतराव यांना बोलावले गेले याचे खरे पित्त त्यांना आहे. त्यामुळेच याप्रकरणात आरोप प्रत्यारोप केले गेले आहेत.

होळकर घराण्यात भुषणसिंह यांचे नेमके काय स्थान आहे, ते इंदोर सोडून जयसिंगपूरला का राहतात, याचे नेमके उत्तर समाजाला माहिती नाही. होळकर घराण्यातील प्रॉपर्टीचा वाद असल्याप्रमाणे त्यांनी यशवंतराव होळकरांची बदनामी सुरू केली आहे. भूषणसिंह यांना भाजपकडून आमदार, खासदारकी मिळवायची आहे. धनगर समाजाच्या सामाजिक चळवळीत पडळकरांप्रमाणे भुषणसिंह होळकर यांचेही काडीचे योगदान नाही. त्यांना धनगर समाजाचे आयते नेतृत्व हवे आहे. त्याच्या जीवावर त्यांना पदे पदरात पाडून घ्यायची आहेत. या राक्षसी मनोवृत्तीमुळे समाजाचे नुकसान होत आहे, असेही ढोणे यांनी म्हटले आहे.

---------------------------------------

झुंडशाहीला पुरून उरणार : ढोणे

दोन वर्षापुर्वी पडळकर आणि उत्तम जानकर यांनी धनगर समाजाची फसवणूक केली. त्यावेळी समाजाला सत्य सांगण्याची भुमिका आम्ही घेतली. यामुळे चिडलेल्या पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी धमक्या दिल्या, मात्र आम्ही  भीक घातली नाही. सहा महिन्यापुर्वी पंढरपुरात माझी पत्रकार परिषद उधळण्याचा प्रयत्न केला, मात्र हटलो नाही. पुर्वी हा प्रकार आटपाडी तालुक्यापुरता सुरू होता, आता बाहेर सुरू आहे. या लांडग्याच्या प्रवृत्तींना धनगर समाजाचे शोषण करू देणार नाही. त्यांना पुरून उरणार, असेही ढोणे यांनी म्हटले आहे.


 

Post a Comment

0 Comments