Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगलीत गटारी व नाल्यांची पंचनामा मोहीम सुरू करणार: ॲड. अमित शिंदे

सांगली (प्रतिनिधी)
महापालिका क्षेत्रामध्ये आजपर्यंत कोट्यावधींची गटारी, ड्रेनेज व नाल्यांची कामे झाली. परंतु चुकीच्या पद्धतीने बांधलेल्या गटारी, नाल्यांवरील अतिक्रमणे, नाले वळविणे, ड्रेनेजच्या समस्या या सर्वांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सोसावा लागत आहे. त्यामुळे रोगराई, डास वाढणे असे आरोग्याचे गंभीर प्रश्न देखील निर्माण होत आहेत. अशा असंख्य तक्रारी रोजच सुधार समितीकडे येत असतात. त्यामुळेच महापालिका क्षेत्रातील गटारी, नाले व ड्रेनेज याचा पंचनामा करून त्याबाबत नागरीकांची श्वेतपत्रिका काढण्याची मोहीम सोमवार पासून सुरू करणार असल्याचे सांगली जिल्हा सुधार समितीचे अध्यक्ष ॲड. अमित शिंदे यांनी सांगितले.

याबाबत बोलताना ॲड. अमित शिंदे म्हणाले की, महापालिका क्षेत्रामध्ये दरवर्षी कोट्यावधींची गटारींच्या बांधकाम, दुरूस्तीची कामे केली जातात. नाले सफाई व नाले दुरूस्तीसाठी देखील दरवर्षी भरमसाठ निधी खर्च केला जातो. ड्रेनेज योजनांची कामे नित्याचीच झाली आहेत. परंतु या सर्वांची फायदा होण्याऐवजी चुकीच्या कामांमुळे व बेकायदेशीर कामांना अभय दिल्यामुळे नागरीकांना जास्तीत जास्त तोटाच होत आहे. खर्च केलेला कोट्यावधींचा निधी अक्षरश: वाया जात आहे. यामुळे आरोग्याचे व पर्यावरणाचे गंभीर प्रश्न निर्माण होण्यासोबतच वेगवेगळ्या मुद्यांमुळे गल्ली गल्ली त भांडणतंटे सुद्धा होताना दिसत आहेत. यातून सांगली जिल्हा सुधार समितीकडे रोज शेकडो तक्रारी येत राहतात, त्यामुळे या कामांचे परिक्षण करणे अत्यंत आवश्यक बनले आहे.

त्यामुळेच या गटारी, नाले व ड्रेनेज च्या कामाचा जागेवर पंचनामा करण्याची मोहीम आम्ही सुरू करत आहोत. या मोहीमेमध्ये गटारीच्या कामाचा दर्जा, त्याचे विविध पाणी वाहन क्षमता, डहाळ, सुरवात व शेवट; नाल्यांची प्रत्यक्ष अवस्था, त्यांवर केलेला खर्च याचा पंचनामा करण्यासोबतच नागरीकांना याचा फायदा झाला की तोटा याचा अभिप्राय घेवून या सर्व कामांची "नागरीकांची श्वेतपत्रिका" काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर हा अहवाल जनतेसमोर मांडण्यासोबतच शासनाला सादर करून त्याबाबत मागण्या करणार आहोत.

तरी ज्या भागांत नागरीकांना या गटारीं, नाले यांचा त्रास होत आहे त्यांनी संपर्क करण्याचे आवाहन ॲड. अमित शिंदे यांनी केले आहे. यावेळी जयंत जाधव, महालिंग हेगडे, अल्ताफ पटेल, संतोष शिंदे, प्रशांत साळुंखे, दत्ता पाटील, अभिषेक खोत, सुरेश हक्के आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments