Daily Mahasatta

Daily Mahasatta

विरोधकांनी दिशाभूल करू नये : उपसरपंच दाजीराम नलवडे

विटा (मनोज देवकर )
वलखड गावात पडलेल्या हायमास्ट पथदिवे आणि खांब या साहित्याचा आणि ग्रामपंचायतीचा संबंध नाही. सदर खांब माऊली फौंडेशनने दान दिलेले आहेत. दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत वलखड येथे हायमास्ट बल्ब मंजूर आहेत. परंतु सदरच्या कामाची तांत्रिक मंजुरी डिसेंबर 2020 रोजी मिळालेली आहे. साहित्य खरेदीची निविदा २४/१२/२०२० ला प्रसिद्ध केली आहे. अद्याप खरेदीची प्रक्रिया न झालेने बिल देखील दिलेले नाही. त्यामुळे गावातील काही लोकांनी "राजकीय कुरघोडी " करण्याच्या दृष्टीने गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यात उल्लेख केलेली हाय मास्ट पोल संदर्भातील माहिती दिशाभूल करणारी आहे, असे निवेदन वलखड चे उपसरपंच दाजीराम नलवडे यांनी माध्यमांना दिले आहे.

दलित वस्ती सुधार योजनेतून ज्या ठिकाणी मंजूर आहेत त्या ठिकाणी पोल बसवण्यात येतील. वलखड गावच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जिल्हा परिषद शाळेच्या विकासासाठी नागरिकांच्या सहकार्याने सुधारणा केल्या आहेत. चौदाव्या वित्त आयोगातून गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यात आलेला आहे. कृषी विभाग आणि पाणी फौंडेशन च्या माध्यमातून ओढा खोलीकरण आणी जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत. दलित वस्ती मध्ये समाज मंदिराची दुरुस्ती करण्यात आली आहे. जागोजागी पेव्हिंग ब्लॉक बसवण्यात आले आहेत. गावात शिक्षण, स्वच्छता, सर्व वाड्यावस्तीवर पिण्याच्या पाण्याची सुविधा, सांडपाणी व्यवस्थापनासाठी शोष खड्डे याचा वापर करणे, रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण व त्याची निगा,काळाची गरज ओळखत शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे महत्व पटऊन देण्यासाठी कृषि विभागामार्फत व्याख्यानमाला ठेवणे,जि. प. शाळेत आणि गावात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.

वलखड गावचा विकास व्हावा यासाठी आम्ही कट्टीबद्द आहोत. येणाऱ्या काळात नवीन ग्रामपंचायत इमारत बांधकाम, जुना वलखड मायणी रस्ता, सार्वजनिक जागेवर उद्यान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक, वॉटर फिल्टर प्लांट आणि पिण्याच्या पाण्याची नवीन टाकी, सर्व वाड्या वस्तीवर गरजेनुसार स्ट्रीट लाईटची व्यवस्था करणे, मुलांना सुसज्ज व्यायामशाळा, इत्यादी कामे नियोजित आहेत.

वलखड गावचा विकास सातत्याने व्हावा म्हणून सार्वत्रिक प्रयत्न होण्याची गरज असताना केवळ राजकीय उद्देशाने ग्रामपंचायत आणि गावची बदनामी करू नये. असे नलवडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटल आहे. काही दिवसांपूर्वी वलखड ग्रामपंचायतच्या कारभारासंदर्भात काही लोकांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. त्या बाबत हा खुलासा विद्यमान सरपंच आणि सदस्यांनी केला आहे.

Post a Comment

0 Comments