Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

टेंभूचे शिल्पकार म्हणून अनिलभाऊंचा उल्लेख करावाच लागेल : स्वर्गीय आर. आर. पाटील

विटा (मनोज देवकर)
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व लोकप्रिय नेते आर आर पाटील ( आबा) यांचा व आमदार अनिल भाऊ बाबर यांचा ऋणानुबंध संपूर्ण जिल्ह्याला माहीत आहे. दोघांच्याही राजकीय भूमिका काळाच्या ओघात बदलल्या. पण स्नेह कायम राहिला. आज आबा आपल्यात नाहीत. एक जिवलग मित्र गमावल्याचे दुःख अनिलभाऊंना सदैव जाणवत राहते. २०१४ साली अनिलभाऊ बाबर यांच्या वाढदिवशी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर आर (आबा) पाटील यांनी दिलेल्या शुभेच्छा आबांच्या शब्दात .....

" तुम्ही वाढदिवस करताय म्हणूनच त्यांचं वय वाढतंय. मी महाराष्ट्रामध्ये आपले भिलारे गुरुजी असतील, धुळाप्पा अण्णा नवले असतील आणि तिसरा उल्लेख मी अनिलभाऊंचा करेन. त्यांच्या दिसण्यामध्ये मला कधीही फरक जाणवला नाही. आणखी काही दिवसांनी अनिलभाऊ , तुम्ही नेहमीच आम्हाला असे दिसा..!"

जसा दिसण्यामध्ये बदल नाही. तसा , सत्ता आली , सत्ता गेली. चांगले दिवस आले, वाईट दिवस आले. स्वभावामध्ये सुद्धा काडीमात्र बदल नाही. अलीकडच्या काळामध्ये राजकारण थोडसं बदललंय. आणि बदलताना थोडसं बिघडलंय सुद्धा. पैसा, पैश्यातून सत्ता. सत्तेतून पैसा. पैश्यातून पुन्हा सत्ता. असे समीकरण बनत असताना लोकांतून सत्ता, आणि लोकांच्या साठी सत्ता हे समीकरण भाऊ आयुष्यभर जगत आलेले आहेत.

सत्ता आली की माणसांची गर्दी होते. आणि सत्ता गेली की जवळची माणसे सुद्धा बेपत्ता होतात. अशी मी महाराष्ट्रात अनेक उदाहरणे बघितली आहेत. पण नेता असावा अनिल भाऊंच्या सारखा. आणि कार्यकर्ते असावेत तुमच्यासारखे. कदाचित विधानसभेची सत्ता ही टिकली नसेल. पण लोकांच्या हृदय सिंहासनावर , प्रेमानं वागण्याने , एक अढळ स्थान भाऊंनी आपल्या आयुष्यात मिळवलं आहे.

आपला भाग हा दुष्काळी आहे. सधन भागाचं पुढारपण करणे हे खूप सोप्पे असते. पण दुष्काळी भागातल्या व्यथा, अडचणी , लोकांचे प्रश्न , त्यामुळे लोकांची नाराजी सुद्धा लवकर होते. सत्तेत असताना , सत्तेत नसताना , लोकांना कसे वाटेल हे न बघता , आपल्या लोकांचे मूलभूत प्रश्न सुटले पाहिजेत. विशेषतः शेतीच्या पाण्याच्या बाबतीत , एवढं सातत्य ठेऊन सांगली जिल्ह्यामध्ये कुणी प्रयत्न केले असतील तर ते अनिलभाऊंनी केले.

आमदार असताना अनेकवेळा रागाने बोलायचे. त्यांना विसर पडला असेल. पण आजही त्यांनी माझ्याकडे आमदार असताना टेंभुच्या पाण्यासाठी दोनदा दिलेले राजीनामे , मी भाऊ जपून ठेवले आहेत. हे होत नसेल तर मग पदावर तरी का रहायचे ? असं भाऊ म्हणत. काही लोक हे कधीच कुठल्या कामाचे श्रेय, क्रेडिट कुणाला देत नसतात. पण ज्यावेळी दुष्काळी भागातील शिवार फुलेल. त्यावेळी माणसं नाही बोलली, तरी येणारी पिकं व शिवार बोलल्याशिवाय राहणार नाही. अनेक घाव घातलेतच, आता शेवटचा घाव बाकी आहे. भाऊ, ज्या टेंभू च्या पाण्यासाठी आपण सातत्य ठेऊन प्रयत्न केले, हे मी आमदार असतानाही बोललो होतो. उद्या आपल्या सांगली जिल्ह्याच्या प्रगतीबद्दल कुणाला लिहायचं झालं तर , टेंभू योजनेचा शिल्पकार म्हणून भाऊंचा उल्लेख करावाच लागेल.

राजकारणासारख्या क्षेत्रात टिका टिपणी अधिक वाट्याला येते. शेतीच्या पाण्याच्या प्रश्न सोडवत असताना , गोरगरीब माणसांशी बांधिलकी जपत आपण राजकारण करताना थोडेशे हिशोब मागेपुढे झाले, होतील. शेवटी सत्य सुद्धा लोकांना कळून चुकते. एवढ्या प्रतिकूल परीस्थिती मध्ये सुद्धा आपण राजकारण करत आहात हेच आपल्या लढवय्या वृत्तीचं प्रतीक आहे. असं म्हणलं तर चुकीचं ठरू नये.

अनेक लोक सत्तेत येतात, सत्तेतून पायउतार होतात. अशी अनेक उदाहरणे आहेत. पण लोकांत मिळवलेलं प्रेम ही तुमची आयुष्यात मिळवलेली खूप मोठी मिळकत आहे. तुम्हा सगळ्यांचं हे कुटुंब अबाधित राहो. खूप मोठं काम तुमच्या हातून घडावं. लोक सुद्धा पुन्हा चांगल्याच्या शोधात निघाले आहेत. असे बदलाचे संकेत देशामध्ये अनुभवायला मिळत आहेत. त्यामुळे या पुढच्या काळामध्ये राजकारणातील समीकरणे सुद्धा थोडीशी बदलतील. चांगल्याला चांगलं म्हणणं जनतेसाठी आवश्यक होईल. मला सुद्धा राहून राहून वाटतं. सोनं प्युअर आहे हे कळल्यावर सुद्धा लोक पुन्हा पुन्हा का परीक्षा बघतात? आणि सोन्यालाच परीक्षा का द्यावी लागते ? चांगल्याच्या समोरच आव्हाने का येतात..? पण शेवटी हा सृष्टीचा थोडासा नियम आहे. राजकारणातील चांगुलपणा अनिल भाऊ तुम्ही टिकवून ठेवलाय. भविष्यात ही तुम्ही तो टिकवून ठेवा..! शुभेच्छा.

Post a comment

0 Comments