Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

विटा पालिकेसमोरील भूखंडावर अखेर मोफत पार्किंग

विटा ( मनोज देवकर )
विटा शहरात दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला आहे. अशात नगरपरिषद इमारती समोरील भूखंडावर पार्किंग करण्यात यावे अशी मागणी होत होती. राजकीय दृष्टया पंचमुखी मंदिरापाठीमागील आणि नगरपरिषदेसमोरील आठ गुंठे जागेवर अनेक टिका टिपणी होत होत्या. आज पालिका प्रशासनाने मुरूम आणि मातीचा भराव टाकून सदर जागा पार्किंग साठी खुली करून दिली आहे.

पालिकेचे मुख्याधिकारी अतुल पाटील , माजी बांधकाम सभापती फिरोज तांबोळी यांच्या उपस्थितीत आज सदर जागेवर मातीचा भराव टाकून जागा समतल करण्याचे काम तातडीने करण्यात आले. त्यामुळे तुर्तास विट्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अस्ताव्यस्त गाड्या पार्किंग करण्याचे प्रमाण कमी होईल . या जागेत मोफत पार्किंग झाल्याने सदर जागेवर काही बड्या लोकांची नजर असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

सदर पार्किंगची व्यवस्था पुरेशी नाही. क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा ते विटा बसस्थानक या मार्गावर दोन्ही बाजूनी अनेक वाहने अस्ताव्यस्त पार्क करण्यात येतात. विटा न्यायालय, प्रशासकीय इमारत , पोलीस स्टेशन या मार्गावर असल्याने लोकांची प्रचंड गर्दी या परिसरात होत असते. त्यामुळे मुख्य चौकात तसेच मायणी रोड, कराड रोड येथे ट्रॅफिक जाम होण्याचे प्रकार वारंवार होत असतात. तरी विटा शहरात ज्यांना यायचे नाही अश्या अवजड वाहनांसाठी रिंग रोड होणे गरजेचे आहे.

Post a comment

0 Comments