Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

जत सारख्या दुष्काळी भागात पत्रकारांचे कार्य उल्लेखनीय - तुकाराम बाबा महाराज

: श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या वतीने पत्रकारांचा सत्कार

जत (सोमनिंग कोळी)
जत हा दुष्काळी तालुका आहे . दुष्काळी तालुक्यात आपल्या लेखणीतून शासन, प्रशासनाला जागे करणे, समाजजागृती करणे हे अवघड कार्य. पण अवघड कार्य दुष्काळी जत तालुक्यातील पत्रकारांनी प्रामाणिकपणे केले. आज दुष्काळी जत तालुक्यातील अनेक पत्रकार बांधव जिल्ह्यात, राज्यात आपला नावलौकिक करत आहेत. दुष्काळी तालुक्यातील पाण्याचा, दुष्काळाचा, विविध सामाजिक प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम पत्रकार बांधवांनी केले. जतसारख्या दुष्काळी भागात पत्रकारांचे कार्य उलखनीयच असल्याचे प्रतिपादन चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी केले.

जत तालुक्यातील संख येथील बाबा आश्रम येथे श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या वतीने जत तालुक्यातील पत्रकार बांधवांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानावरून तुकाराम बाबा महाराज बोलत होते. यावेळी व्यासपीठावर तुकाराम बाबा महाराज यांची आई व वडील यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रासपचे माजी जिल्ह्याध्यक्ष अजित पाटील, शहराध्यक्ष भूषण काळगी, मानवधिकार संघटनेचे संजय धुमाळ, सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष मनोहर पवार, अखिल भारतीय पत्रकार परिषदेचे तालुकाध्यक्ष दिनराज वाघमारे, पत्रकार संघाचे माजी तालुकाध्यक्ष मारुती मदने यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या वतिने सर्व पत्रकारांचे छायाचित्र असलेले कॅलेंडरचे प्रकाशन करण्यात आले. जतसारख्या दुष्काळी भागात पत्रकार बांधव जोमाने कार्य करतात, अनेक विषयाला वाचा फोडण्याचे कार्य करतात, समाजातील तळागाळपर्यत विविध योजना पोहचविण्यासाठी, समाज जागृतीसाठी जी त्यांची धडपड सुरू असते ही कौतुकास्पद आहे. त्यांच्या या कार्याला जतकरांनी पाठबळ द्यावे असे आवाहन तुकाराम बाबा महाराज यांनी केले.

अजित पाटील यांनी जतमध्ये पत्रकार बांधव यांचे योगदान सांगण्याबरोबरच प्रत्येक पत्रकार बांधवांनी स्वतःच्या पायावर उभा रहावे, असे आवाहन करून तुकाराम बाबा महाराज यांनी कोरोनाच्या काळात केलेल्या कार्याला तोड नाही. श्री संत गाडगेबाबा, श्री संत बागडेबाबा यांच्या पावलावर पाऊल ठेवत कार्य करत असल्याचे आवर्जून सांगितले.
------------------------------------------

■ सात जूनला संख ते मुंबई
मंत्रालय पाण्यासाठी पायीदिंडी...

जत तालुक्यातील शेवटच्या गावापर्यत पाणी येइपर्यत आपला पाण्यासाठीचा राजकारण विरहित लढा सुरूच राहणार आहे. येत्या सात जूनला पुन्हा संख ते मुंबई मंत्रालयापर्यत पायी दिंडी काढण्यात येणार असल्याचे यावेळी तुकाराम बाबा महाराज यांनी जाहीर केले.
--------------------------------
■ तुकाराम बाबांना
समाजभूषण पुरस्कार जाहीर...

कोरोनाच्या कठीण काळात जतकरांना मास्क, सॅनिटायझर, जीवनावश्यक किट, भाजीपाला तुकाराम बाबा महाराज यांनी पोच केला. मानव मित्र संघटनेच्या माध्यमातुनही त्यांचे समाजकार्य सुरूच आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने समाजभूषण पुरस्कार देवून गौरविण्यात येणार असल्याचे यावेळी परिषदेचे तालुकाध्यक्ष दिनराज वाघमारे यांनी जाहीर केले.

Post a comment

0 Comments