Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

माझा अणु एवढा संबंध नाही, तुम्ही मात्र ' रेणुशी ' जोडलात : खासदार श्रीनिवास पाटील

विटा ( मनोज देवकर )
मी वारकरी माणूस. अणू-रेणू या तोकडा तुका आकाशा एवढा असं म्हणणारा. मी, ज्या विषयाशी माझा अणू एवढाही संबंध नाही आणि तुम्ही तो संबंध थेट 'रेणू ' शी जोडलात! हे योग्य नाही अशा शब्दांत खासदार श्रीनिवास पाटील यांनी धनंजय मुंढे प्रकरणाबाबत काही प्रसार माध्यमांविषयी खंत व्यक्त केली.

आज रविवारी विटा येथील सामाजिक कार्यकर्ते गजानन सुतार यांच्या निवासस्थानी खासदार पाटील आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी मुक्त संवाद साधला. ते म्हणाले, औदुंबर साहित्य संमेलनात मी जे काही बोललो त्याचा विपरीत अर्थ काढण्यात आला. सांगलीचे प्राध्यापक वैजनाथ महाजन यांनी प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे त्याची पत्नी असते असे विधान केले होते. त्यावर मी इतकेच म्हणालो, पत्नी बरोबरच त्याची बहीण, आई ,आजी असते. माझ्या पाठीमागे माझी आई होती. प्रसिद्धी माध्यमे पराचा कावळा करतात हे माहिती होते पण यांनी पार बगळा केला.

वास्तविक मुंबईत जे काही चाललंय त्याची पुरेशी माहितीही मी घेतलेली नाही. त्या बद्दल मी काहीही प्रतिक्रिया सुद्धा दिलेली नाही. परंतू, काही प्रसिद्धी माध्यमातील लोकांनी माझ्या या साध्या वक्तव्याचा गैरअर्थ काढला. मी बीड जिल्ह्याचा कलेक्टर होतो त्यावेळी गोपीनाथ मुंढे, प्रमोद महाजन वगैरेसुद्धा लहान होते. त्यांच्याशी माझे मित्रत्वाचे संबंध होते असे ही खासदार पाटील यांनी आवर्जून सांगितले.

Post a comment

0 Comments