Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

आमचे पाणीदार आमदार ' मा. अनिलभाऊ बाबर '

विटा ( मनोज देवकर)

लोककवी विठ्ठल वाघ त्यांच्या " वेदांत " ह्या कवितेत म्हणतात,

अमृताचे खरे नाही
सत्य फक्त पाणी आहे,
हे ज्याला कळले तो
वेदात्यांहून ज्ञानी आहे.

सांगली सातारा जिल्ह्यातील कडेगाव , खानापूर , आटपाडी ,माण ,खटाव , जत , कवठेमहांकाळ हा दुष्काळग्रस्त परिसर. पर्जन्यछायेचा प्रदेश असल्याने पाऊस पडला तर पडतो नाहीतर नाही. अश्या या भागात शेती करणे हे धाडसाचे काम. पाणी असेल तर ओसाड माळाचाही मळा करता येतो. पण या मातीचं वैशिष्ट्य की इथल्या भूमीपुत्रांच्या रक्तात जिद्द , चिकाटी व जगण्याची उर्मी आहे. पाणी नसल्याने , शेतीवर उदरनिर्वाह शक्य नसल्यानं हजारो लहान थोर जगण्यासाठी देशभर गेले. गलाई व्यवसायात पैसा, नाव , इज्जत कमावली. त्यांनी इथल्या मातीशी जोडलेली नाळ तुटू दिली नाही. हे खरंच. पण एक माणूस इथल्या उजाड,ओसाड माळावर नंदनवन फुलावे म्हणून स्वप्न पाहता झाला. खानापूर, आटपाडी सह दुष्काळग्रस्त भागाला कृष्णा नदीचं हक्काचं पाणी मिळावं म्हणून सर्व स्तरावर, सातत्यपूर्ण , जिद्दीने , अभ्यासपूर्वक संघर्ष करणारा नेता म्हणजे अनिलभाऊ बाबर.. कारण त्यांना कळलं होतं, "अमृताचे खरे नाही, सत्य फक्त पाणी आहे..!"

दुष्काळ हाच आपला शत्रू मानून आम जनतेला दिशा दाखवणारा नेता म्हणजे अनिलभाऊ बाबर. राज्याच्या विधिमंडळात अपवाद वगळता गेली तीन दशके या भागाचे नेतृत्व करत असताना यश अपयशाला तेवढ्याच ताकदीने पचवण्याची क्षमता असणारा कर्तृत्ववान नेता म्हणून उभा महाराष्ट्र त्यांना ओळखतो. कोणतेही राजकीय पाठबळ नसताना व सत्तेशीवाय राजकारणात आपले नाव तेवत ठेवत समाजसेवा हीच ईश्वर सेवा हे व्रत जपणारा , लोकप्रिय नेता म्हणून भाऊंना ओळखले जाते. दुष्काळी जनतेच्या स्वप्नात सुद्धा कृष्णेचे पाणी येत नव्हते , अश्या स्थितीत स्वतः चा स्वार्थ न पाहता शासनाच्या मागे लागून मिळेल तेवढा निधी आपल्या मतदारसंघाच्या पदरात पाडून विकासकामांची गंगा त्यांनी वाहती ठेवली आहे.

वयाच्या १९ साव्या वर्षी गार्डी गावचे सरपंच म्हणून आणि याच वयात "संघर्ष कला क्रीडा मंडळाची " स्थापना करून मंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक कामांची उभारणी भाऊंनी सुरू केली. ती आजअखेर ५० वर्षांपासून अखंड सुरू आहे. १९७२ ला भाऊ सांगली जिल्हा परिषद सदस्य आणि बांधकाम सभापती , १९८२ ते १९९० पर्यंत आठ वर्षे जुन्या खानापूर पंचायत समितीचे सभापती म्हणून काम करण्याचा सर्वाधिक बहुमान अनिलभाऊंना मिळाला. याच कालावधीत त्यांनी राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून परिसरात सामाजिक व शैक्षणिक परिवर्तन घडवले. भाऊंच्या कामगिरीची दखल घेत इथल्या दुष्काळग्रस्त जनतेने १९९० साली त्यांना "आमदार " बनवून महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवले.

आमदारकीच्या काळात , प्रसंगी सत्तेत सहभागी असताना सुद्धा , जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सरकारशी दोन हात करावेत ते भाऊंनीच. मग तो टेंभू , ताकारी , आरफळ योजनेचा प्रश्न असेल अथवा जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न असेल. २००३ च्या दुष्काळात आमदार फंड ताकारी योजनेच्या वीज बिलासाठी देण्याचे घोषित करणारा पहिला आमदार म्हणजे अनिलभाऊ.

काळ बदलला, राजकारणात पैश्याचा वारेमाप वापर होऊ लागला. राजकारण बदललं, बदलत असताना बरचसं बिघडलं. लोक, लोकांकडून सत्ता, सत्तेतून पैसा. पुन्हा पैश्यातून सत्ता असे "विचित्र" समीकरण तयार झाले आहे. मतांची खरेदी विक्री सुरू झाली. धनदांडग्या पुढाऱ्यांनी जनतेची दिशाभूल करणं नेहमीचं होऊन बसले आहे. पण या गदारोळात भाऊ सत्तेशीवाय राहिले पण जनतेशीवाय राहिले नाहीत. पद , सत्ता , खुर्ची असो वा नसो त्यांनी कार्यकर्त्यांना कधी अंतर दिले नाही. म्हणून भाषणात अनिलभाऊ भाषणात सांगत असतात, " आजचा काळ सोशल मीडियाचा आहे. टाकलेली पोस्ट डिलीट करता येते. प्रचार करून लोकांपर्यंत कमी वेळात पोहचता ही येते. पण मी गेल्या पन्नास वर्षात माझ्या कामाच्या माध्यमातून जनतेच्या ह्रदयापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला आहे !" हे त्यांचे शब्द अंतःकरणापासून निघालेले वाटतात. भाऊंचे जनतेच्या मनातील स्थान , हृदयातील जागा कुणीही डिलीट करू शकणार नाही हे ही तितकेच खरे आहे.

कोणत्याही राजकीय ताकदी पुढे नमत त्यांनी आपली विकासाची दिशा बदलली नाही. कार्यकर्त्यांची फळी मोडू दिली नाही. शेती , शेतकरी , शेतीसाठी पाणी, द्राक्षबागायत , डाळींब उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न यावर ते सातत्याने अभ्यासपूर्ण आवाज उठवत आहेत. शासनदरबारी सर्वसामान्य जनतेचा आवाज बनून , सरकारला धोरण ठरवण्यासाठी भाग पाडत आहेत. त्यांना परमेश्वर उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य देवो ही त्यांच्या वाढदिवशी सिध्दनाथ चरणी प्रार्थना..!

शब्दांकन
मनोज देवकर ( विटा)

Post a comment

0 Comments