Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

अनिलभाऊंनी आणलेल्या निधीचा खुल्या मनाने स्वीकार करा : सुहास बाबर

विटा ( मनोज देवकर )
' बळवंत कॉलेजने फिरणं बंद केलं, तर तुम्हाला चालायला सुद्धा गार्डीला यावं लागतय, ही अवस्था नगरपालिकेची आहे. त्यामुळे अनिलभाऊंनी मंजूर करून आणलेल्या बारा कोटींच्या निधीचा खुल्या मनाने स्वीकार करा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी विटा नगरपरिषदेतील सत्ताधारी पाटील गटाला केले आहे.

आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या प्रयत्नातून विटा नगरपरिषद हद्दीतील कामासाठी १२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित बैठकीत सुहास बाबर बोलत होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय विभुते, नगरसेवक अमोल बाबर उपस्थित होते.

सुहास बाबर म्हणाले, शहरातील रस्ता काँक्रीटचा होणे गरजेचे आहे , पण कंत्राटदाराचे दायित्व संपेल तेंव्हा रस्ता काँक्रीटीकरण करण्याची नगरपालिकेची क्षमता आहे का ? विटा मोठं होतंय, ट्रॅफिक चा प्रश्न गंभीर होत आहे. पण तुमचं मन मोठं होईना. तुमची मानसिकता बदलेना. हे गाव मोठं झालं पाहिजे. तुम्ही दिघंची, रहिमतपूर बघून या. सांगोला सारख्या दुष्काळग्रस्त गावात ही प्रशस्त रस्ते होत आहेत. रस्त्याची जागा सोडून बांधकाम परवाने दिले जात आहेत. त्या नगरपालिकेचे स्वतः चे खेळाचे मैदान आहे. चाळीस वर्षे तुम्ही नगरपालिका सांभाळताय, तुम्ही काय केले ? असा सवाल सुहास बाबर यांनी केला.

यावेळी जिल्हा प्रमुख संजय विभुते यांनी देखील पाटील गटावर खरमरीत टीका केली. विभुते म्हणाले,
विटेकरांची कशी का वाट लागेना. कुठल्यांना कुठल्या गोष्टींमध्ये मलिदा मिळाला पाहिजे. आमच्या कंपनीला काम मिळालं पाहिजे, अशी विटा नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांची वृत्ती आहे. विटेकर जनता कर भरते. जनतेच्या त्या पैशांची वाट कुणी लावली ? असा घणाघात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी केला.

विभुते म्हणाले, दुसऱ्याला पोरगं झालं की पेढे आपणच वाटायचे, अशी सवय नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांना आहे. दरवर्षी विट्यामध्ये अंतर्गत जे रस्ते होत आहेत, त्या रस्त्यांच्या दर्जा काय ? विट्यातून जाणारा महामार्ग प्रशस्त आणि काँक्रीट व्हायला हवा होता. पण यांच्या काही लोकांची दुकाने जातील, यांना त्रास होईल म्हणून प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याची सवय बदला असे आवाहन विभूते यांनी केले.

बावीस टक्के विटा अनिल भाऊंच्या पाठीमागे होते ते पन्नास टक्क्यांपर्यंत का गेले याचा अभ्यास करावा. आम्हाला राजकारण करायचं नाही. विट्याच्या जनतेला चांगल्या दर्जाच्या सुविधा दिल्या पाहिजेत. नऊ मीटर चे रस्ते, तात्पुरता ले आऊट, अंतिम मंजुरी देण्यात येते. बांधकाम परवाना मागितला का तुमचा प्रत्यक्ष नऊ मिटर रस्ता भरत नाही असं सांगून अडवणूक केली जाते असा आरोप विभूते यांनी केला. हा सगळा गैरकारभार मोडीत काढण्याचं काम येणाऱ्या काळात आम्ही सर्वजण मिळून करू असे विभूते म्हणाले . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी निधी उपलब्ध केल्याचे त्यांनी सांगितले.

Post a comment

0 Comments