Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

कोरोनाच्या नावाखाली मुख्यमंत्री घरी बसून आहेत : चंद्रकांतदादा पाटील

इस्लामपूर, ( सूर्यकांत शिंदे )
कोरोनाच्या नावाखाली राज्याचे मुख्यमंत्री घरी बसून आहेत आणि बाकीच्या मंत्र्यात कसलाही ताळमेळ नाही, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केली.

राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ आणि रयत क्रांती संघटना कामगार आघाडी यांच्यातर्फे आयोजित असंघटित कामगारांच्या मेळाव्यात ते बोलत होते. माजी कृषिमंत्री सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार भगवानराव साळुंखे, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल महाडिक, नगरसेवक विक्रम पाटील, अमित कदम, जयराज पाटील, पृथ्वीराज पवार, स्वरूपराव पाटील प्रमुख उपस्थित होते.

ते म्हणाले, "कामगारांना पाच हजार किमतीचे किट द्यायचा निर्णय घेतला होता, साडे आठ हजार कोटी महामंडळाकडे पडून आहेत. स्वस्त घर देण्याची योजना, आरोग्य योजना आहे. पण सगळे बंद पडले आहे. सरकारच्या मानेवर बसून कामगारांना आवश्यक असणाऱ्या गोष्टींचा पाठपुरावा करावा लागेल. शेतकरी आणि कामगार यांना मोदींनी अनेक योजनांच्या माध्यमातून दिलासा दिला. या सरकारने कोरोना काळात निर्माण झालेल्या समस्यांसाठी पॅकेज द्यावे लागेल. आगामी काळात या सरकारच्या विरोधात संघर्ष करावा लागेल." पडळकर म्हणाले, "असंघटित कामगारांच्या प्रश्नांसाठी सदाभाऊ आणि आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू. पडून असलेले दहा हजार कोटी सरकारने द्यावेत."

सदाभाऊ खोत म्हणाले, "राज्यात भाजप सरकारच्या काळात कामगार नोंदणीनंतर मिळणारे पाच हजार या सरकारने बंद केले. कामगारांचे प्रश्न केंद्र सरकारच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू. सर्वसामान्य लोक आमचे वैभव आहेत. त्यांच्या गळ्याला नख लावणाऱ्यांचे हात कलम करू. गोरगरीब कामगारांना वाऱ्यावर सोडणार नाही. आंधळं, बहिर आणि मुकं सरकार आहे. याना वेदना कळत नाहीत. कोरोनाकाळात योग्य व्यवस्था करू शकले नाही. रोजगार नाही, वीज बिल वाढून आले, माफी मिळाली नाही. शेतकरी कायद्याच्या बाबतीत मोदी सरकार सक्षम आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत." भगवानराव साळुंखे, सागर खोत, अमित कदम, संदीप पाटोळे यांची भाषणे झाली. सलीम सय्यद, मोहसीन पटवेकर, बजरंग भोसले आदींनी संयोजन केले.

केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्याला समर्थन देणारे निवेदन देण्यासाठी प्रांत कार्यालयात मोर्चा काढण्यात आला. सदाभाऊ खोत, आमदार पडळकर यांच्या नेतृत्वाखाली मेळाव्याला उपस्थित असणाऱ्या कामगारांनी एकत्र जाऊन प्रांत कार्यालयात निवेदन दिले.

Post a Comment

0 Comments