Daily Mahasatta

Daily Mahasatta

खानापूर तालुक्याच्या गावगाड्यात ही घराणेशाही, पहा.. कोण आहे निवडणूकीच्या रिंगणात

विटा ( मनोज देवकर )
युवकांना संधी मिळाली पाहिजे फक्त तो तरुण आपला नातलग किंवा घरातलाच असला पाहिजे असे धोरण राजकारणात पहायला मिळत आहे. या भावनेची लागण ग्रामपंचायत निवडणुकीत सुद्धा झालेली पहायला मिळत आहे. आदर्श गाव म्हणून देशात प्रसिद्ध असलेल्या "पाचोरा" चे आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी निवृत्ती जाहीर केली असली तरी त्यांच्या कन्या निवडणुकीला उभ्या आहेत. असेच चित्र खानापूर तालुक्यात ही पहायला मिळत आहे.

मंगरूळ मध्ये नऊ जागांसाठी अठरा उमेदवार रिंगणात आहेत. कॉंग्रेसचे जेष्ठ नेते आणि विक्रमवीर माजी जिल्हा परिषद सदस्य रामराव दादा पाटील यांची तिसरी पिढी राजकारणात उतरली आहे. प्रभाग क्रमांक एक मधून रामराव दादांचे नातू अभिजित पाटील निवडणुकीला उभे आहेत. त्यांच्या विरोधात आमदार बाबर यांचे कट्टर समर्थक प्रशांत शिंदे उभे आहेत. त्यांचे वडील सुरेश शिंदे खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय होते. अनेक माजी पदाधिकारी बाबर , पाटील आणि पडळकर गटाकडून उभे असल्याने निवडणुकीची रंगत वाढली आहे.

माहुली गाव हे राजकीय दृष्ट्या संवेदनशील गाव राहिले आहे. टेंभू योजनेच्या पाण्यासाठी आंदोलने करण्यात चिखलहोल आणि माहुलीतील सर्वपक्षीय कार्यकर्ते आघाडीवर होते. या गावात पारंपरिक देशमुख गट आणि पाटील गट यांचे राजकारण चालत असे. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पॅनल उभे केल्याने सद्या तीन पॅनल निवडणुकीच्या रिंगणात आहेत. माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पाटील आणि माजी पंचायत समिती सभापती भारती पाटील यांचे पुतणे प्रणव प्रकाश पाटील नशीब आजमावत आहेत.

खानापूर तालुक्यात तेरा ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली , त्यातील तांदळगाव आणि भडकेवाडी या दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. शेवटच्या टप्प्यात प्रचार शिगेला पोहचला आहे. देवीखिंडी गावात पारंपारीक विरोधक असलेल्या बाबर आणि पाटील गटाने बिनविरोध च्या दृष्टीने तयारी केली होती. पण गोपीचंद पडळकर यांना मानणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांनी पॅनल लावल्याने गावात निवडणूक लागल्याचा आरोप बाबर आणि पाटील गटाचे कार्यकर्ते करत आहेत.

खंबाळे आणि मंगरूळ मध्ये दोन गटात समोरासमोर लढत होत आहे. आमदार अनिल बाबर यांच्या सुनबाई व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्या पत्नी सोनिया बाबर या प्रचारात सक्रिय आहेत. गावोगावी गलाई व्यावसायिकांना मतदानासाठी बोलविण्यासाठी फिल्डिंग लावण्यात येत आहे. खंबाळे येथील बाबर गटात फूट पडल्याचे वृत्त असून ग्रामपंचायत इमारतीच्या भूमीपूजनापासून एका गटाने फारकत घेतली आहे. त्यातून जय हनुमान आणि दरगोबा पॅनल अशी दोन पॅनल उभे राहिले आहेत. जय हनुमान चे नेतृत्व उद्योजक रवींद्र निकम, सुभाष पवार , विजय सुर्वे , अमोल सुर्वे करत आहेत. दरगोबा पॅनल चे नेतृत्व दिनकर सुर्वे , सरपंच लक्ष्मण शिरतोडे , प्रताप पाटील, काँग्रेस चे सुभाष सुर्वे करत आहेत.

Post a Comment

0 Comments