जत (प्रतिनिधी) - महाराष्ट्र,कर्नाटक व आंध्र येथील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेली जतची श्री. यल्लमा देवीची यात्रा यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. तरीही भाविकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने जत तालुका प्रशासनाकडून दि. ८ जानेवारी ते १३ जानेवारी पर्यंत मंदिर परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आल्याची माहिती प्राताधिकारी प्रशांत आवटी यांनी दिली आहे.
जत शहरातील बिळूर रोडला असलेल्या श्री. यल्लमा देवी मंदिर परिसरात दरवर्षी मोठी यात्रा भरते. यात्रेला महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातून दहा लाखावर भाविकांची उपस्थिती असते. यंदा ८ जानेवारी ते १३ जानेवारी पर्यंत यात्रा भरणार होती. मात्र देशासह राज्यामध्ये कोरोना महामारीचा प्रादूर्भाव कायम आहे. तरीही यात्रा काळात भाविक मोठ्या संख्येने येण्याची शक्यता असल्याने तालुका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
मंदिर परिसरात सात दिवस जमावबंदी करण्याचा आदेश देण्यात आला आहे. दिनांक ८ ते १३ जानेवारी पर्यंत मंदिर परिसरातील दोन किलोमीटर त्रिज्येच्या स्थलसीमा हद्दीत ७ जानेवारी मध्यरात्री १ वाजले पासून १४ जानेवारी मध्यरात्री २४ वाजेपर्यंत भाविकांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच पाच किंवा त्यापेक्षा जास्त जणांना एकत्र फिरण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे.
जनतेच्या आणि भाविकांच्या आरोग्याची काळजी घेत जारी करण्यात आलेल्या प्रशासनाच्या आदेशाला समस्त रेणुका भक्तांनी सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थान ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष शादुर्लराजे डफळे सरकार यांनी केले आहे.
0 Comments