Daily Mahasatta

Daily Mahasatta

ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळी; शिवसेना - राष्ट्रवादीत वर्चस्वासाठी रस्सीखेच

विटा ( मनोज देवकर)
खानापूर तालुक्यात तेरा ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. त्यापैकी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चंद्रकांत चव्हाण यांची तांदळगाव ग्रामपंचायत बिनविरोध झाल्यात जमा आहे. तालुक्यातील भडकेवाडी ग्रामपंचायत ही बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहे. उरलेल्या अकरा ग्रामपंचायत मध्ये मात्र लोकशाहीचा उत्सव साजरा होणार आहे. तालुक्यात शिवसेनेचे विद्यमान आमदार अनिलभाऊ बाबर आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील या दोन गटात वर्चस्वासाठी रस्सीखेच आहे. त्यात भाजपाचे आ. गोपीचंद पडळकर यांना आमदारकीची लॉटरी लागल्याने त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

सद्या खानापूर तालुक्यात बाबर, पाटील गट सक्रिय आहेत. पडळकर यांच्या माध्यमातून तिसरा गट सक्रिय झाला आहे. आटपाडी च्या देशमुख घराण्याने आमदारकी च्या निवडणुकीला नशीब आजमावले असले तरी खानापूर तालुक्यातील तळागाळातील राजकारणात कधीच स्वारस्य दाखवले नाही. त्याचा फटका त्यांना नेहमी बसत आला आहे. पडळकर मात्र ती चूक करताना दिसत नाहीत. त्यांनी खानापूर तालुक्यातील लढणाऱ्या कार्यकर्त्यांना बळ देण्याची भूमिका घेतलेली दिसत आहे.

राज्यात "महाविकासआघाडी " सत्तेत एकत्र नांदत असली तरी गावोगावच्या निवडणुका पॅनल करून लढवल्या जातात. तिथे गटातटाच्या तसेच कुरघोडीच्या राजकारणाचा अनुभव येत असतो. प्रत्येक नेता आपला गट आणि ताकद टिकवण्यासाठी प्रयत्न करत असतो. त्यामुळे अपवाद वगळता ग्रामपंचायत निवडणुका नेत्यांचे अस्तित्व दाखवणाऱ्या मापदंड ठरतात.

खानापूर तालुक्यातील माहुली ग्रामपंचायत मध्ये पाटील गटाच्या संग्राम देशमुख गटाची सत्ता होती. सिंधुताई माने या सरपंच होत्या. माहुली गावात पंचायत समिती व जिल्हापरिषदेच्या राजकारणात नेतृत्वाची संधी लाभलेल्या विजय पाटील यांचा गट कार्यरत आहे. सद्या माहुलीत तीन पॅनल निवडणूक लढवत आहेत. त्यात भाजपाच्या पडळकर यांना मानणारा गट अॅड. शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहे. तर प्रदीप माने यांनी तिसरे पॅनल उभे केले आहे. कार्यकर्त्यांची सरमिसळ झाली असल्याने नेमके कोण कोणाच्या गटाचे याचा अंदाज लावणे कठीण झाले आहे. देशमुख घराण्याने यावेळी अलिप्तता बाळगली आहे.

देवीखिंडी मध्ये बाबर व पाटील गट एकत्र निवडणूक लढवत आहेत. प्रकाश निकम बाबर गटाचे तर दादासो निकम पाटील गटाचे नेतृत्व करतात. त्यांची लढत पडळकर गटाशी होणार आहे. भाजपाच्या गटाचे नेतृत्व बबन निकम करत आहेत. अपक्षांनी ही अर्ज भरल्याने देवीखिंडी गावची निवडणूक रंगतदार होणार आहे. एकंदरीत देवीखिंडी गावचा पॅटर्नच वेगळा आहे.

रेणावी ग्रामपंचायत मध्ये बाबर गटाची सत्ता आहे. यावेळी तीन पॅनल निवडणूक लढवत आहेत. पाटील गट , बाबर गट व वसंतराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तिसरं पॅनल निवडणूक लढत असल्याने रेणावी ची निवडणूक चुरशीची होणार आहे. खंबाळे , पारे, पोसेवाडी, मेंगाणवाडी, भिकवडी, शेंडगेवाडी, नागेवाडी आणि मंगरूळ मध्ये बाबर व पाटील या पारंपारीक गटात लढती होत आहेत. या निवडणुकांच्या निमित्ताने पडळकर गटाला अस्तित्व दाखवण्याची संधी मिळत आहे.

Post a Comment

0 Comments