Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

महाराष्ट्र साखर कारखाना संघाचे अध्यक्ष पदी पी. आर. पाटील; खासदार शरदचंद्र पवार यांची घोषणा

इस्लामपूर (सूर्यकांत शिंदे )
राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी.आर.पाटील यांनी निरपेक्ष भावनेने भरताची भूमिका पार पाडली आहे. त्यांनी प्रदीर्घ काळ सहकारी साखर कारखानदारीच्या माध्यमातून समाज, व शेतकऱ्यांची सेवा केली आहे,ती अखंड चालू राहील. आम्ही त्यांची महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष म्हणून निवड करीत आहोत,अशी घोषणा राष्ट्रीय नेते,राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांनी कुरळप येथील समारंभात केली.

कुरळप (ता.वाळवा) येथे राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी.आर.पाटील (दादा) यांच्या अमृत महोत्सवी सत्कार समारंभात ते बोलत होते. माजी राज्यपाल खा.श्रीनिवास पाटील,जल संपदामंत्री जयंतराव पाटील,सहकार मंत्री बाळासाहेब पाटील,कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम,माजी मंत्री अण्णासाहेब डांगे,खा.धैर्यशील माने,आ.मानसिंग नाईक,युवानेते प्रतीक पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी खा.पवार यांच्या हस्ते श्री.पी.आर. पाटील ,सौ.रत्नकांता पाटील यांचा शाल,सन्मानचिन्ह,व मानपत्र देवून गौरव करण्यात आला. तसेच 'गाथा पांडुरंगाची' या गौरव अंकाचे प्रकाशन, व युनोव्हा गाडीही प्रदान करण्यात आली.

खा.पवार म्हणाले, राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष दांडे गांवकर यांची मुदत मार्च महिन्यात संपत असून त्यांना देशाच्या साखर कारखाना संघाच्या अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. त्यांच्या जागेवर पी.आर.पाटील यांची निवड करीत आहोत. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा निश्चितपणे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होईल. भविष्यात केवळ साखर निर्मिती करून चालणार नाही. उपपदार्थ निर्मितीवर लक्ष केंद्रीत करावे लागेल. ऊसाचे गाळप केल्यानंतर शिल्लक राहणाऱ्या चोथ्यापासून वीज निर्मिती करावी लागेल. रेकटीफाय स्पिरीट तयार करावे लागेल. आणि ईएनए म्हणजे गॅस तयार करावा लागेल. ही व्यवस्था राज्यातील सर्व साखर कारखान्यात करावी लागेल. त्यासाठी दृष्टी असणारा पी.आर.पाटील यांच्या सारखा नेता हवा आहे.
पी.आर.पाटील यांच्या सार्वजनिक कार्याची सुरुवात लोकनेते राजाराम बापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे. बापूंनी राज्यातील अनेक जिल्ह्यातील तरुण कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले आहे. बापू हे सार्वजनिक क्षेत्रात कार्यकर्ते घडविणारी फॅक्टरी होते. त्यांनी सांगली जिल्ह्यात कार्यकर्त्यांची मोठी फळी उभा केली. त्यातीलच पी.आर. पाटील एक आहेत. पी.आर.पाटील यांनी शेती,सहकार क्षेत्रासह सांस्कृतिक क्षेत्रात काम केल्याने अनेक दिग्गज कलावंतांशी त्यांचे निकटचे संबंध आले आहेत. सलग ५१ वर्षे सहकार साखर कारखान्या मध्ये संचालक,आणि २५ वर्षे अध्यक्ष पदी राहणे सोपे.

खा.श्रीनिवास पाटील म्हणाले," पी.आर.दादा म्हणजे लहान-मोठ्यांचे प्यारे दादा आहेत. ते व त्यांच्या पत्नी रत्नकांता म्हणजे पांडुरंग-रुक्मिणीचा जोडा आहे."
ना.जयंत पाटील म्हणाले," बापूंनी निस्पृह माणसांचा ठेवा माझ्या साठी ठेवला असून या माणसांनी मला लहानाचा मोठा केला आहे. त्यामध्ये दादा अग्रस्थानी आहेत. ते पहिल्या संस्थापक संचालक मंडळापासून संचालक मंडळात आहेत. त्यामध्ये ते २५ वर्षे चेअरमन आहेत. त्यांनी सातत्याने संस्थेच्या हिताची जपणूक केली आहे. ते एक आदर्श कुटुंब प्रमुख,आदर्श शेतकरी,बोलेल तसे वागणारे नेते आहेत. कुरळप व परिसराच्या विकासात ते,व त्यांच्या वडिलांचा पुढाकार आहे."

पी.आर.पाटील (दादा) सत्कारास उत्तर देताना म्हणाले, मी कायम भरताची भूमिका पार पाडली आहे. माझ्या कारकिर्दीत ना.जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या साखर कारखान्याने यशस्वी वाटचाल केल्याचे मला समाधान आहे. मी आयुष्यात धन संपदा नव्हे, जन संपदा कमविली आहे. यावेळी साखर कामगारांच्या वतीने कामगार नेते शंकरराव भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी दादांचा सत्कार केला.
सत्कार समितीचे अध्यक्ष प्रा.शामराव पाटील यांनी स्वागत,व प्रास्ताविक केले.
आ.सुमनताई पाटील,आ.अरुण लाड,आ.शेखर निकम,माजी आ.चंद्र दीप नरके,माजी आ.बाबासाहेब पाटील (सरुडकर) सत्यजित देशमुख, तुकाराम जगताप, शहाजी काकडे, विशेष पोलीस महानिरीक्षक फत्तेसिंग पाटील, जिल्हाधिकारी अभिजित चौधरी,जिल्हा पोलिस प्रमुख दीक्षित गेडाम, डॉ.इंद्रजित मोहिते,कराडचे सारंग पाटील,माणिकराव पाटील, विनायक पाटील,विष्णुपंत शिंदे,महेंद्र लाड,आष्टा नगराध्यक्षा स्नेहा माळी, अविनाश पाटील,अँड.बाबासो मुळीक,सुरेश पाटील,संजय बजाज, सौ.छाया पाटील,झुंझारराव शिंदे, अँड.चिमनभाऊ डांगे,बाळासाहेब पाटील,संजय पाटील,शहाजी पाटील, सौ.सुस्मिता जाधव यांच्यासह राजारामबापू समूहातील पदाधिकारी, तसेच कुरळप,व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयबापू पाटील यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments