Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

विटा परिसरात बिबट्या चा वावर, सोशल मीडियात मात्र उडवली जातेय " टर"

विटा ( मनोज देवकर )
खानापूर तालुक्यात बिबट्या ची जोडी फिरत असल्याच्या चर्चेने खळबळ माजली आहे. परीसरात शेतकरी बाहेर जायला घाबरत आहेत. ऊस लागण, ऊस तोडणी चा हंगाम सुरू आहे. महावितरण फक्त दोन दिवस दिवसा शेतीसाठी वीज पुरवठा करते त्यामुळे शेतकऱ्यांना रात्र पाळी करावी लागते. त्यात "पानसे मळा , जाधव वस्ती " परिसरातील बिबट्या चा व्हिडिओ वायरल झाल्याने खळबळ माजली आहे. मात्र सोशल मीडियात "तुझीच कमी होती, तुझं विट्यात स्वागत" असे स्टेटस ठेऊन टर उडवली जात आहे. 
पहा विट्यातील बिबट्याचा व्हिडिओ

डिसेंबर महिन्यात कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे परिसरात बिबट्याचे दर्शन झाले होते. सागरेश्वर अभयारण्य परिसरातून हा बिबट्या विटा परिसरात आला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
बिबट्याने सागरेश्वर येथील बिरोबा देवालय येथे देवराष्ट्रे येथील तरुणावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता.
परंतु तरुणाच्या चलाखीने त्याच्या तडाख्यातून सुटका करून घेतली होती. या घटनेमुळे सागरेश्वर घाटात बिबट्याची दहशत झाली होती. दुचाकीस्वार, शेतकरी यांच्यात भीतीचे वातावरण आहे. बिबट्या अभयारण्याबाहेर बाहेर आहे याची खात्री डिसेंबर महिन्यातच झाली आहे. विट्यापासून देवराष्ट्रे, सागरेश्वर अभयारण्य पंचवीस- तीस किलोमीटर लांब आहे. हे अंतर लेपर्ड जातीच्या बिबट्या साठी जास्त नाही.

शेतीसाठी रात्रीच्या वेळी वीज पुरवठा केला जातो. मात्र बिबट्याच्या भीतीने परिसरातील शेतकरऱ्यांनी रात्रीच्या वेळी शेतात जाणे टाळले आहे. याचा परिणाम पिकांवर होत आहे. बिबट्या विषयी अधिक माहिती
इतर मोठ्या मार्जारांपेक्षा बिबट्यांच्या खाद्यामधे जास्त वैविध्य असते व प्रांताप्रमाणे बिबट्यांच्या खाद्यामधे बदल होतो. सर्व प्रांतातील बिबट्यांचे मुख्य खाद्य म्हणजे खूर असलेले प्राणी. पण ते माकडे, उंदरांसारखे कृंतक प्राणी, सरीसृप (सरपटणारे प्राणी), उभयचर, पक्षी व किडेदेखील खातात. कधीकधी ते कोल्ह्यासारखे इतर लहान शिकारी प्राणीहीद्धा खातात.

बिबट्या भारतात चितळ, सांबर, भेकर, चौशिंगा व वानर यांची शिकार करतो. मात्र त्याला त्याच्या लहान आकारमानामुळे फार मोठी शिकार करणे शक्य होत नाही, उदा. मोठे सांबर किंवा नर नीलगाय. अशा भक्ष्यांची तो सहजासहजी शिकार करत नाही. वाघ किंवा इतर मोठ्या मार्जारांच्या तुलनेत तो कुठल्याही वातावरणात सहज सामावून घेतो, अगदी गावांशेजारी सुद्धा. अशा ठिकाणी राहणारे बिबटे, हे बकऱ्या, गुरे व कुत्र्यांवर गुजराण करतात. रशियामध्ये ते सायबेरियाई रो हरीण, सीका हरीण, एल्क अशा प्राण्यांची शिकार करतात. आफ्रिकेमध्ये ते मध्यम आकाराच्या कुरंगांची (ॲन्टिलोप्सची) शिकार करतात.

बिबट्या व दक्षिण अमेरिकेतील जॅग्वार यांच्या स्वरूपामधे बरेच साधर्म्य असले, तरी बिबट्या हा जॅग्वारपेक्षा आकारमानाने लहान असतो. जॅग्वारच्याही त्वचेवर गुच्छाकृति छप्पे असले तरी, त्याच्या छप्प्यांमधे काळे ठिपके असतात, तसे बिबट्याचा छप्प्यांमधे नसतात. याच्या अंगावरील ठिपक्यांमुळे चित्ता या प्राण्याशी नेहमी लोक गफलत करतात. खरेतर बिबट्या व चित्ता हे दोन्ही मार्जार कुळातील असले तरी दोघांच्यात खूपच फरक आहे. भारतातून चित्ता हा प्राणी पूर्णपणे नामशेष झाला आहे, तर बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

चित्याचे ठिपके हे मुखत्वे भरीव असतात व बिबट्याचे ठिपके हे पोकळ असतात. चित्याची शरीरयष्टी लांबसडक व अत्यंत वेगाने पळण्यास सक्षम असते तर बिबट्याची बहुधा मांजराप्रमाणेच भरीव असते. बिबटे मनुष्यवस्तीजवळ रहाणे जास्त पसंत करतात व तेथील कुत्री, पाळीव जनावरे हे त्यांचे आवडते भक्ष्य आहे. यामुळेच दरवर्षी बिबट्या मनुष्यवस्तीत घुसण्याच्या शेकडो घटना घडतात. चित्ता मुख्यत्वे जंगलातच राहणे पसंत करतो.

Post a comment

0 Comments