Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

सांगलीत कुत्र्यांचे ' शुभमंगल सावधान '

: अनोख्या लग्न सोहळ्याची जिल्ह्यात चर्चा
सांगली ( प्रमोद अथणिकर)
जगात हौसेला मोल नाही, याचा प्रत्यय पावलो पावली येत असतो. याचाच प्रत्यय सांगलीमध्ये आला आहे. येथील एका कुटुंबाने चक्क श्वानांचे लग्न लावले आहे. इतकंच नव्हे तर मोठ्या थाटात या अनोखा लग्न सोहळ्याची आयोजन करण्यात आले होते. टायगर व डॉली असे विवाहबद्ध झालेल्या श्वानांचे नाव आहे. विशेष म्हणजे या लग्न सोहळ्याला वऱ्हाडी मंडळीही उपस्थित होते.

सांगली शहरात एक लग्न सोहळा पार पडला. हा विवाह सोहळा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. कारण लग्न मंडपात वर-वधू मुलगा-मुलगी नव्हे तर चक्क श्वान होते. हे वाचून तुम्हाला नवल वाटेल. मात्र, हे खरे आहे. संजय नगर येथील विलास गगणे कुटुंबांच्या दारात हा लग्नसोहळा पार पडला. गगणे यांच्या घरात कुटुंबापैकी असणारे टायगर आणि डॉली यांचा हा विवाह सोहळा कुटुंबीयांनी आयोजित केला होता.

गेल्या काही वर्षांपासून गगणे यांच्या घरामध्ये वेगवेगळ्या जातीचे श्वान पाळले जातात. त्यापैकी टायगर आणि डॉली यांचे गगणे कुटुंबीयांनी चक्क लग्न लावून दिले. हा विवाह सोहळा त्यांनी थाटामाटात पार पाडला. एखाद्या सामान्य कुटुंबातील वधू-वराच्या लग्न सोहळ्याप्रमाणे सर्व आयोजन करण्यात आले होते. लग्न मंडप, वधू असलेल्या डॉलीची चारचाकी गाडीतून लग्नमंडपात आगमन, संगीतच्या ठेक्यावर नाचणारी वऱ्हाड मंडळी, विधिवत पूजा, रुखवत, आहेर-माहेर, साश्रु नयनांनी वधूची बिदाई आणि जेवणाच्या पंगती, असा छोटेखानी डामडौल या श्वानांचा विवाह सोहळा पार पडला. या अनोख्या लग्नसोहळयासाठी आसपासच्या परिसरातील नागरिक आणि बच्चे कंपनी मोठ्या संख्येने हजर होते.

Post a comment

0 Comments