Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

शरद पवारांच्या भुमिकेचे सत्य अण्णा डांगे यांनी सांगावे: विक्रम ढोणे यांचे आवाहन

सांगली (प्रतिनिधी) ज्येष्ठ नेते अण्णा डांगे हे गेल्या काही दिवसांपासून धनगर एसटी आरक्षणप्रश्नी संभ्रम करणारी माहिती देत आहेत. 2014 साली शरद पवार यांनी एसटी आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता, पण समाजातील नेत्यांनी टीका केल्याने त्यांनी आरक्षण दिले नाही, असे अण्णा डांगे यांचे म्हणणे आहे. यासंदर्भातील सत्य डांगे यांनी सांगावे, तसेच पुरावे द्यावेत, असे आवाहन धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केले आहे. 

अण्णा डांगे हे संस्थापक असलेल्या धनगर महासंघाची नुकतीच धुळे येथे राज्यस्तरीय बैठक झाली. या बैठकीत अण्णा डांगे यांचे पुत्र अॅड. चिमण डांगे यांची धनगर महासंघाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल चिमण डांगे यांचा सत्कार दि. 26 डिसेंबर 2020 रोजी इस्लामपूर (ता. वाळवा) येथे होत आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते होणाऱ्या
या कार्यक्रमाला धनगर समाजाचे प्रतिनिधित्व म्हणून मंत्रीमंडळात संधी मिळालेले राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे ही उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमातून धनगर समाजाची दिशाभुल होण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे ज्येष्ठ नेते अण्णा डांगे यांच्यासह मंत्री जयंत पाटील यांनी आरक्षणप्रश्नी नेमकी भुमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे, असे ढोणे यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यापासून धनगर एसटी आरक्षणप्रश्नी काडीचेही कामकाज झालेले नाही. नावाला एक बैठक झाली, पण तीही फुसका बार ठरली आहे. आता पुन्हा बैठकीचा फार्स होवू नये. मंत्रीसमिती स्थापन करून आरक्षणाची कायदेशीर प्रक्रिया पार पाडली पाहिजे, अशी आमची भुमिका असल्याचे नमूद करून विक्रम ढोणे म्हणाले की, धुळे येथील धनगर महासंघाच्या बैठकीत अण्णा डांगे यांनी केलेले विधान धनगर समाजाच्या आरक्षणप्रश्नी अत्यंत महत्वाचे आहे. अण्णा डांगे हे अनेक वर्षे आमदार आणि कॅबिनेट मंत्री राहिलेले आहेत. त्यांना प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्या म्हणण्याला विशेष महत्व आहे.

अण्णा डांगे यांनी धुळे येथील बैठकीत बोलताना 'शरद पवार यांनी धनगर समाजाला एसटी आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता, पण समाजातील नेत्यांनी टीका केल्याने आरक्षण दिले नाही', असे विधान केले आहे. 2014 साली बारामतीत धनगर समाजातील कार्यकर्त्यांना पैसे देवून शरद पवारांच्या बदनामीसाठी मोर्चा काढण्यात आला, असेही डांगे यांनी म्हटले आहे. अण्णा डांगे यांचे हे आरोप गंभीर आहेत. समाजाचे प्रश्न गतीने सुटण्यासाठी या आरोपांची पोलखोल होणे आवश्यक आहे. यासंबंधाने उपस्थित झालेल्या प्रश्नांची उत्तरे मिळणे गरजेचे आहे.

2014 साली विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर बारामतीत धनगर समाजाचे मोठे आंदोलन झाले. तत्पुर्वी शरद पवार यांनी आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता, असे डांगे यांचे म्हणणे आहे. मात्र वस्तुस्थिती फार वेगळी आहे. शरद पवार यांनी असा निर्णय घेतला होता, असे डांगें व्यतीरिक्त कोणालाही माहिती नाही. तसे अद्याप कुणी जाहीर केले नाही. स्वत: पवार यांनी असे कधी म्हटलेले नाही. महत्वाची बाब म्हणजे असे आरक्षण देण्याचा अधिकार असलेल्या घटनात्मक पदावर त्यावेळी शरद पवार नव्हते. काँग्रेसचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
यांच्या नेतृत्वाखाली पवार यांचा पक्ष सत्तेत सहभागी होता, मात्र त्यावेळी राष्ट्रवादी पक्षानेही कधी आरक्षणाचा निर्णय घेतल्याची जाहीर भुमिका सांगितली नाही. त्यामुळे पवारांनी निर्णय घेतला होता, या म्हणण्याला काहीही अर्थ नाही. शिवाय शरद पवार यांच्यावर टीका केल्याने त्यांनी आरक्षण दिले नाही, हे म्हणणेही हास्यास्पद आहे. यातून समाजात फक्त संभ्रम निर्माण होत आहे.

शरद पवारांच्या हातात असताना त्यांनी आरक्षण दिले नाही, असा याचा स्पष्ट अर्थ होतो आहे. पृथ्वीराज चव्हाणांच्या सरकारपेक्षा उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये
पवारांच्या शब्दाला सर्वाधिक किंमत आहे. मग पवार आता कां आरक्षण देत नाहीत? त्यामुळे यासंबंधीचे नेमके सत्य अण्णा डांगे यांनी समाजाला सांगावे. 2014 साली पवारांनी आरक्षण देण्याचा निर्णय कुठे आणि केव्हा घेतला होता, हे पुराव्यानिशी जाहीर करावे, असे आवाहनही ढोणे यांनी केले आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील हे विरोधी पक्षात असताना धनगर आरक्षणप्रश्नी आग्रही असायचे. धनगर समाजाची वेशभुषा करून विधीमंळात लक्ष वेधायचे मात्र सत्तेत आल्यापासून त्यांनाही या प्रश्नाचा विसर पडला आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून शरद पवारांची आणि पक्षाची धनगर आरक्षण प्रश्नासंबंधीची नेमकी भुमिका समाजाला सांगावी. अण्णा डांगे सत्य सांगत आहेत की नाही, हे स्पष्ट करावे. शिवाय, 2019 च्या निवडणुकांवेळी शरद पवारांनी आरक्षणप्रश्नी अध्यादेश काढण्यासंबंधी सोलापुरात विधान केल्याचा खुलासा करावा. शरद पवारांनी ते विधान केले होते कां? ते खरे असेल तर आता कां आदेश काढला जात नाही, हे स्पष्ट करावे, असे ढोणे यांनी म्हटले आहे.

Post a comment

0 Comments