Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

राष्ट्रवादीच्या नगरसेविकेवर अन्याय; भाजप कार्यकर्ते रस्त्यावर

सांगली (प्रतिनिधी)
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या आदिवासी प्रवर्गातील नगरसेविका स्वाती पारधी यांनी पक्षाकडून होणार्या अन्यायाला कंटाळून आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे एका आदिवासी प्रवर्गातील नगरसेविकेवर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ भाजपच्या भटके - विमुक्त जाती मोर्चाच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर रस्त्यावर उतरत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या निषेधाच्या घोषणा देत निदर्शने केली.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात आदिवासी समाज व मागासवर्गीय समाजातील कार्यकर्ते व नगरसेवकांवर सातत्याने अन्याय होत आहे. त्यांच्या प्रभागात काही कामावरून वाद आहे. सततच्या वादाला कंटाळून नगरसेवक योगेंद्र थोरात व नगरसेविका स्वाती पारधी यांनी महापालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते. याबाबत पक्षाच्या नेत्यांकडे तक्रार करूनही काहीच उपयोग झाला नाही.

नगरसेवक थोरात यांनीही सातत्याने अन्याय होत असल्याचे सांगितले आहे. भाजपवर जातीयवादी असल्याचा आरोप करणारा राष्ट्रवादी हाच खरा जातीयवादी आहे. त्यामुळे आम्ही त्यांचा निषेध करतो असे संघटन सरचिटणीस दीपक माने यांनी सांगितले. यावेळी राजू जाधव, राहुल माने, ज्योती कांबळे, गीता पवार, संगीता जाधव, निलेश निकम, अमित भोसले, राजू मद्रासी यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

Post a comment

0 Comments