Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार, आरोपीला १० वर्षाची शिक्षा

इस्लामपूर, ( सूर्यकांत शिंदे)
अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी सोनवडे (ता. शिराळा) येथील अरुण उर्फ बाबू सुनील जमदाडे (वय २०) याला आज येथील न्यायालयाने दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. हा गुन्हा ७ ऑगस्ट २०१८ रोजी घडला होता. कोकरूड पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल होता. याबाबत अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. सी. मूनघाटे यांच्यासमोर सुनावणी झाली.

याबाबत माहिती अशी की, ७ ऑगस्ट २०१८ ला सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास सोनवडे मधील थळपांढरी येथे आठ वर्षे वयाचा एक मुलगा खेळत असताना अरुण उर्फ बाबू सुनील जमदाडे याने त्याला घराच्या पाठीमागील बाजूस ओढत नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. संबंधित घटनेची नोंद कोकरूड पोलीस ठाण्यात होती. या प्रकरणात फिर्यादी पक्षातर्फे एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. शिवाय अरुण उर्फ बाबू सुनील जमदाडे याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर जामीन मिळाल्यानंतर देखील त्याने जामिनावर असताना त्याच गावातील एका महिलेवर बलात्कार केल्याचीही तक्रार होती. त्यामुळे त्याची गुन्हेगारी वृत्ती विचारात घेता त्याला जास्तीत जास्त गंभीर शिक्षा मिळावी यासाठी सरकारी वकील रणजित पाटील यांनी युक्तिवाद केला. त्यानुसार न्यायाधीशांनी त्याला १० वर्षे सश्रम कारावास तसेच पाचशे रुपये दंड आणि दंड न भरल्यास आणखी एक महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली. तपासी अंमलदार एन. जे. उबाळे, एस. ए. गावडे यांनी प्रकरणाचा तपास केला. चंद्रकांत शितोळे, पी. जी. आपटे यांनी तपासात सहकार्य केले.

Post a comment

0 Comments