Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

वेजेगाव हद्दीतील टेंभूच्या कालव्यात मानवी सांगाडा सापडल्याने खळबळ

विटा ( मनोज देवकर )

वेजेगाव हद्दीतून दावल मालिक डोंगराजवळून टेंभू योजनेचा साठ फुटांपेक्षा अधिक खोल आटपाडी कालवा जातो. या कालव्यात महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील सांगाडा सापडला आहे. देवीखिंडी व वेजेगाव पोलीस पाटील यांना मिळालेल्या माहितीनंतर त्यांनी विटा पोलिसांना वर्दी दिली.

या बाबत अधिक माहिती अशी , वेजेगाव च्या उत्तरेला टेंभू योजनेचा आटपाडी तालुक्यात जाणारा खोल कॅनॉल आहे. सदर परिसरात फारशी माणसांची वर्दळ नसते. या ठिकाणी कालव्यात मानवी सांगाडा कुजलेल्या अवस्थेत सापडला . विटा पोलिसांच्या पथकाने सदर सापळा खोल कालव्यातून बाहेर काढून पुढील प्रक्रियेस सुरवात केली आहे. मृतदेह कुजून फक्त हाडांचा सापळा उरला आहे. त्याशेजारी अर्धवट कुजलेल्या स्थितीत पिवळ्या रंगाची साडी व एक मोरपंखी साडी कमरेला बांधलेल्या स्थितीत आढळून आली. काचेच्या हिरव्या बांगड्या व लमाण समाजातील स्त्रिया घालतात तसे पांढरे कडे सापडले आहे.

सदर कालव्यात मागच्या महिन्यांपर्यत पाणी साठलेले होते. माहुली पंप हाऊस चे आऊट लेट भिकवडी च्या माळावर आहे तिथून हा कॅनॉल सुरू होतो. सद्या पाणी आटल्याने सदर सांगाडा गुराख्यांना दिसला. बांगड्या व साडीवरून हा सांगाडा महिलेचा असावा. हा खून , घातपात की आत्महत्त्या ? सदर सांगाडा कुणाचा? याचा तपास लावण्याचे आव्हान विटा पोलिसांसमोर आहे. अधिक तपास विटा पोलीस करत आहेत.

Post a comment

0 Comments