Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

सांगलीत ८१ बेवारस वाहने जप्त; आयुक्त नितीन कापडणीस यांची कारवाई

सांगली (प्रतिनिधी)
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्रात गेल्या शनिवारपासून सुरू झालेल्या बेवारस वाहन जप्तीच्या मोहिमेत आठ दिवसात ८१ वाहने जप्त करण्यात आली आहेत. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशाने गेली आठ दिवस ही मोहीम सुरू आहे. आज शनिवारी सांगली शहरातील १० वाहने पथकाने जप्त केली आहेत.

सांगली महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर बेवारस वाहने पडून असल्याने याचा वाहतुकीला अडथळा होत होता. शिवाय आरोग्याच्या समस्या सुद्धा निर्माण झाल्या होत्या. यामुळे अशी बेवारस आणि रस्त्यावर विनावापर पडून असणारी वाहने जप्त करण्याचे आदेश मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिले होते. यानुसार उपायुक्त राहुल रोकडे यांनी केलेल्या नियोजनानुसार दोन पथकाद्वारे सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात मागील शनिवारपासून बेवारस वाहन उचलण्याची मोहीम गतीने सुरू आहे.

या मोहिमेत सहायक आयुक्त सहदेव कावडे, एस एस खरात, सचिन पाटील, दत्तात्रय गायकवाड आणि अतिक्रमण विभाग प्रमुख दिलीप घोरपडे ,स्वच्छता निरीक्षक वैभव कुदळे, प्रणिल माने, धनंजय कांबळे, गणेश माळी, श्रीकांत मद्रासी, अतुल आठवले, किशोर कांबळे, अंजली कुदळे, कोमल कुदळे, पंकज गोंधळे , विक्रम घाडगे यांच्यासह मनपा कर्मचारी सहभागी झाले होते. या आठ दिवसात मनपाने तिन्ही शहरातून ८१ वाहने जप्त केली आहेत. आज शनिवारी सांगली शहरातील गावभाग, कृष्णामाई रोड, संजोग कॉलनी, या परिसारातील १० वाहने जप्त केली आहेत.

ही मोहीम अशीच सुरू राहणार असून नागरिकांनी आपली रस्त्यावरील विना वापरात असणारी वाहने तातडीने काढून घ्यावीत अन्यथा त्यांच्या वाहनावर जप्तीची कारवाई केली जाईल असा इशारा अतिक्रमण विभाग प्रमुख दिलीप घोरपडे यांनी दिला आहे. तसेच ज्यांची वाहने जप्त केली आहेत. त्यांनी दोन दिवसात आपली वाहने दंड भरून न्यावीत अन्यथा ती वाहने लिलावात काढली जातील असा इशाराही दिलीप घोरपडे यांनी दिला आहे.

Post a comment

0 Comments