Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

खानापूर पंचायत समितीच्या आवारात कचर्याचे साम्राज्य

विटा ( मनोज देवकर )
विटा शहर स्वच्छतेच्या बाबतीत देशात अग्रेसर आहे. विटा नगरपालिका शहर स्वच्छ व सुंदर कसे राहील म्हणून सातत्याने प्रयत्नशील राहिली आहे. देश पातळीवर अनेक स्पर्धांमध्ये विटा शहरास अनेक पुरस्कार प्राप्त झाले असताना शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या पंचायत समितीच्या आवारात मात्र वेगळेच चित्र पहायला मिळत आहे.

पंचायत समिती आवारातील एकमेव कचराकुंडी भरून तिच्या अवतीभवती कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले आहे. आवारात मोकाट कुत्र्यांचा वावर असतो. झाडांचा पालापाचोळा, भटक्या कुत्र्यांची विष्ठा जागोजागी पहायला मिळाली. पार्किंग परिसरात अनेक जुन्या भंगार गाड्या धूळ खात वर्षानुवर्षे पडून आहेत.

पार्किंग एरियाच्या एका कोपऱ्यात आधार कार्ड केंद्र चालवण्यात येते. तिथे दिवसभर लोकांची वर्दळ असते. आबाल वृद्ध रांगेत उभे असतात. त्यांची वाट पाहत बसण्याचीही साधी सोय करण्यात आलेली नाही.

फक्त अधिकारी वर्ग व जनतेचे निवडून गेलेले प्रतिनिधी जिथे बसतात त्या दालनांची स्वच्छता करण्यात येत असावी असे दिसते. पंचायत समितीच्या "नावलौकीकास " साजेसे काम होत रहावे , ते स्वच्छतेच्या बाबतीत ही दिसावे अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

Post a comment

0 Comments