Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

चिकुर्डेत मुस्लिम कुटुंबाकडून हिंदू मुलीचे कन्यादान, परिसरातून कौतुकाचा वर्षाव

पेठ ( रियाज मुल्ला)
एका हृदयापासून दुसऱ्या हृदयापर्यंत जोडलेल्या नात्याला जात धर्म नसतो, याचा प्रत्यय चिकुर्डे ता. वाळवा येथील नागरिकांना आला आहे. येथील एका मुस्लिम कुटुंबाकडून हिंदू मुलीचे कन्यादान अतिशय थाटामाटात करण्यात आले. जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन जपलेल्या या नात्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

चिकुर्डे येथील सुप्रिया पोपट बंडगर असे या मुलीचे नांव असून तिचा विवाह पेठ तालुका वाळवा येथील रवींद्र करे यांच्याशी झाला. हा विवाह चिकुर्डे येथे पार पडला. विशेष म्हणजे या विवाहाला अक्षतासाठी आजूबाजूचे सोडल्यास कोणालाही निमंत्रित करण्यात आले नव्हते. परंतू विवाहासाठी उपस्थित असणाऱ्या लोकांची संख्येचा आकडा मात्र फार मोठा होता. निमंत्रण नसतानाही सुप्रियाच्या डोक्यावर अक्षता टाकण्याकरिता अनेकांनी उपस्थिती लालली होती.

सुप्रिया ही धनगर कुटुंबातील मुलगी. सुप्रिया सहा वर्षांची असताना वडील मृत्यू पावले तर आई तेव्हापासूनच मनोरुग्ण अवस्थेत गेली. मनोरूग्ण असणारी सुप्रियाची आई गावातून तसेच इतर गावातून इकडून तिकडे फिरत राहायची. सुप्रियाचा भाऊ प्रतिक बंडगर हा तिच्यापेक्षा दोन वर्षाने लहान आहे. लहानपणीच वडील वारले व आई मनोरुग्ण झाली असल्याने या लेकरांच्या वरती असणारे मायेची व निवार्‍याची छाया नष्ट झाली. अगोदरच खायचे वांदे असणाऱ्या या कुटुंबात पुन्हा संकटाचा शिरकाव झाल्याने हे दुःख फक्त बंडगर कुटुंबा पुरते मर्यादित न राहता इतरांच्या मनाचा ठाव घेणारा ठरले.

वडील मयत व आई मनोरुग्ण त्यामुळे काही दिवस इतरांच्या कडून हळहळ व्यक्त करण्यात आली. परंतु त्यानंतर मात्र या दोन लहान मुलांचे हाल-बेहाल सुरू झाले. सकाळ काय आणि संध्याकाळ काय या दोघांच्यासाठी सारखीच झाली. पोटापाण्याचा पत्ताच नव्हता. सुप्रिया अवघी सहा वर्षाची व प्रतीक अवघा दोन वर्षाचा असल्याने कशाचाच कशाला पत्ता नव्हता. ही अवस्था पाहून गावातीलच मुस्लिम दांपत्य पैगंबर बच्चूलाल गवंडी व हसीना बच्चूलाल गवंडी यांना या दोन बछड्यांची दया आली. यांचीही आर्थिक स्थिती फार चांगली होती असा प्रकार नव्हता.

परंतू या मुस्लिम दांपत्या जवळ आर्थिक श्रीमंती पेक्षा मनाची श्रीमंती फार मोठी होती. या दोघांनी सुप्रिया व प्रतिक या दोन बेहाल स्थितीत असणाऱ्या बछड्यांच्या मनाचा ठाव घेतला. त्या दोघांना आपल्या गवंडी कुटुंबात सामावून घेतले. आपण आजपर्यंत ऐकले आहे की, एखाद्या दांपत्याला अपत्य नसले की ते एखाद्या अनाथ मुलाला किंवा मुलीला दत्तक घेतात. परंतु या दयाळू मुस्लिम कुटुंबाचे उदाहरण आपल्याला खरोखरच फार वेगळे ठरणारे दिसले. या मुस्लिम कुटुंबांना अमीर गवंडी, सद्दाम गवंडी, अस्मा गवंडी ही तीन अपत्य असताना पुन्हा बेवारस असलेल्या या दोन मुलांना पदरात घेण्याचे धारिष्ट्य व मायाळूपणा त्यांनी जपला.

सुप्रिया व प्रतीक यांना या मुस्लीम कुटुंबाने दत्तक नाही तर रक्ताचे नाते मानूनच त्यांना आपल्या कुटुंबात सामावून घेतले. सुप्रियाला व प्रतीकला दोघांनाही स्वतःच्या मुलाप्रमाणे स्वतःच्या घरात त्यांनी ठेवले. पैगंबर चाच्या व चाची इथपर्यंतच थांबले नाहीत तर आपल्या पोटच्या मुलांना ज्या पद्धतीने खाण्यापिण्यात दिले जात होते त्या पद्धतीनेच सुप्रिया व प्रतीक यांनाही या गवंडी कुटुंबा कडून दिले गेले. आपल्याला तीन मुले नसून पाच मुलांचे वरदान परमेश्वराने दिले असल्याची मानसिकता या दोघांनी ठेवली आणि बेवारस असणाऱ्या सुप्रिया व प्रतिकचा सांभाळ केला.

सुप्रियाने येथील विद्यालयात शिक्षण घेऊन इयत्ता बारावीत तिसरा क्रमांक प्राप्त केला. तर प्रतीक हा माध्यमिक शिक्षण घेऊन चांगल्या प्रकारचे शिक्षण घेत आहे. प्रतिकूल स्थिती असतानाही सुप्रियाने बारावीत चांगल्या प्रकारचे यश मिळवल्याने तिच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. कालांतराने तिला पेठ येथील एका धनगर कुटुंबातून विवाहाची मागणी करण्यात आली. मुलगा व नोकरी या सर्व गोष्टींची चौकशी पैगंबर दंपत्या कडून करण्यात आली.

अखेर येथील रवींद्र करे या युवकाशी सुप्रिया चा विवाह संपन्न झाला. रवींद्र मुंबई येथे कॉलेज वरती नोकरीला असून आता त्याचे आयुष्य सुप्रिया सोबत गुंफले गेले आहे. गवंडी हे बोलताना म्हणाले, सुप्रिया आणि प्रतीक या दोघांचे आम्हा पत्नी - पत्नीला कधीच ओझे वाटले नाही. अनाथ व बेवारस असलेली मुले आम्ही दोघांनी कागदोपत्री नाही परंतु मनाने मात्र आमच्या कुटुंबात सामावून घेतली. आम्हाला तीन मुले नाहीत तर पाच मुले आहेत, असे समजूनच त्यांचा सांभाळ केला.

आज सुप्रियाच्या डोक्यावरती अक्षता टाकताना व तिचे कन्यादान करताना मला व माझ्या पत्नीलाही अश्रू अनावर झाले. मनोमन आम्ही परमेश्वराचे आभार मानले. एक पुण्यकर्म परमेश्वराने आमच्या हातून पार पाडून घेतले आहे. सुप्रियाचा संसार सुखाचा निश्चित ठरेल व प्रतीकलाही चांगले शिक्षण देण्यासाठी परमेश्वर आम्हाला ताकद देईल. एकंदरीत हिंदू मुलीचे मुस्लिम दाम्पंत्या कडून करण्यात आलेले कन्यादान जाती धर्माच्या पलीकडचे नाते निर्माण करणारे असल्याचे उदाहरण चिकुर्डे नगरीत पहावयास मिळाले याचे समाधान अनेकांच्या कडून व्यक्त केले जात आहे.

Post a comment

0 Comments