Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

अभिनेता विनायक चव्हाण यांची मराठी चित्रपट सृष्टीत जोरदार एंट्री

पेठ (रियाज मुल्ला)
शिराळा हा क्रांतीवीरांचा, शूरवीरांचा, संतांचा व कलाकारांचा तालुका आहे. या तालुक्याने देशाला व राज्याला अनेक रत्ने दिली आहेत. समाजकारण, राजकारण, प्रशासन, क्रीडाक्षेत्र अशा विविध क्षेत्रामध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत अनेक जण आपआपल्या कार्याने गावचे, तालुक्याचे नावलौकिक वाढवत आहेत. असेच एक शिराळा तालुक्यातील आंबेवाडी गावचे कलाकार विनायक चव्हाण हे मुंबई येथे मराठी चित्रपट सृष्टी, नाटक, मालिका मधून गावचे व तालुक्याचे नाव वाढवत आहेत.

सध्या विनायक चव्हाण यांची कलर्स मराठी वरील बाळूमामाच्या नावानं चांगभलं ही मालिका तुफान गाजत असून त्यात भीमराव (मगदुम चे जावई ) ही व्यक्तिरेखा साकारत आहेत. शिराळा तालुक्यातील आंबेवाडी या छोट्याशा गावातील विनायक चव्हाण यांना लहानपणापासून कलेचे वेड होते. परंतु घरची परिस्थिती बेताची असल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी 2006 ला गाव सोडून पंजाब या ठिकाणी कामास सुरुवात केली. 2007 ला मध्यप्रदेश याठिकाणी गोल्ड अँड सिल्वर रिफायनरी ची कामे सुरू केले. 2012 मध्ये मुंबई येथे स्वतःचा टूर्स अँड ट्रॅव्हल्स चा व्यवसाय सुरू केला.

मात्र अंगातला कलाकार स्वस्थ बसू देत नव्हता. त्यासाठी ठाणे येथील एका थिएटर मध्ये सामील होऊन येथील कलाकारांची ओळख करून घेतली .विनायक चव्हाण यांच्या अंगात असणारा अभिनय तेथील डायरेक्टर ,कलाकार यांनी ओळखून त्यांना काही नाटकांमध्ये काम करण्याची संधी दिली. अंगची कला कलेचे वेड अन मिळालेल्या संधीचे सोने करत विनायक चव्हाण यांनी त्यांचा एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला. त्यांचा अभिनय पाहून प्रेक्षकांची दाद ,शाबासकीची थाप मिळत गेली नाटकाचे प्रयोग करत करत शॉर्ट फिल्म मध्ये काम मिळत गेले. त्यांच्या अभिनयामुळे एक वेगळी छाप निर्माण झाली .

या माध्यमातून विनायक चव्हाण यांचे चित्रपट मालिकांमधील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते यांचें नातेसंबंध दृढ होत गेले. मुळातच अंगात असणारा अभिनय, कला क्षेत्रात काम करण्याची इच्छाशक्ती, साधे रूप, स्वच्छ प्रतिमा, प्रामाणिकपणे काम करण्याची धडपड त्यामुळे विनायक चव्हाण यांना अनेक मराठी मालिका चित्रपट मध्ये काम करण्याची संधी मिळाली. अरुण नलावडे, समीर धर्माधिकारी, संदेश जाधव ,ऋता दुर्गुळे यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली.
त्यांनी साकारलेल्या मराठी मालिका भेटी लागे जीवा, हृदयात वाजे समथिंग, तू अशी जवळी राहा, स्वराज्य जननी जिजामाता, फुलपाखरू, क्राइम पेट्रोल अशा अनेक मालिकेत काम केले असून असून सद्यस्थितीत बाळूमामाच्या नावानं चांगभलं ही मालिका तुफान चालत आहे. त्याचबरोबर लागिर झालं जी फेम आज्या (नीतीश चव्हाण) व लक्ष फेम अनिकेत केळकर यांच्यासोबत ते लवकरच मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणाऱ्या मराठी चित्रपटात दिसणार आहेत.

गावचा, तालुक्याचा नावलौकिक वाढवणारे विनायक चव्हाण यांनी मराठी चित्रपट सृष्टीत आपले स्वतःचे वेगळे वलय निर्माण केले असून आगामी काळात मराठी चित्रपट सृष्टीत आपल्या भागातील हा चमकता तारा असणार आहे. भूतकाळात हेलकावे खात विनायक चव्हाण यांनी स्वतःचा व्यवसाय सांभाळत आपल्या अंगातील कलेला वाव देत गाव ते अभिनेता इथपर्यंतचा खडतर प्रवास *दैनिक महासत्ता* शी बोलताना व्यक्त केला. त्यांच्या या अथक प्रयत्नांना श्रीरंग चव्हाण, रघुनाथ धुमाळ, अशोक काळे यांचे सहकार्य लाभले.

Post a comment

0 Comments